#LataMangeshkar : ‘ जगभरातील कोट्यवधी संगीतप्रेमींच्या कानांना तृप्त करणारे अलौकिक स्वर आज हरपले’

मुंबई : गेल्या आठ दशकांहून अधिक काळ संगीत विश्वावर अधिराज्य गाजवणाऱ्या भारतरत्न, गानकोकिळा लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांची प्राणज्योत मालवल्याची अत्यंत दुर्दैवी बातमी समोर आली आहे. वयाच्या 93 व्या वर्षी लतादीदींनी जगाचा निरोप घेतला.

मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. कोरोनाची लागण झाल्यानंतर जवळपास महिनाभर त्या हॉस्पिटलमध्ये होत्या. मात्र लतादीदींची तब्येत काल (शनिवारी) अचानक बिघडली. श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती चिंताजनक मात्र स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं. लतादीदी उपचाराला प्रतिसादही देत होत्या, मात्र रविवारी सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

गेल्या आठवडय़ात त्यांच्या प्रकृतीत काहीशी सुधारणा झाली होती. त्यांनी अन्नग्रहणही सुरू केले होते. त्यामुळे काही दिवसांत त्या घरी परततील, असे वाटत असताना आज ही दुखद बातमी समोर आली. खरतर लतादीदींच्या प्रकृतीस आराम पडावा यासाठी जगभरातून प्रार्थना केल्या जात होत्या, मात्र अखेर मंगेशकर यांची आज प्राणज्योत मालवली आहे. या दुखद वृत्तामुळे केवळ भारतच नव्हे तर जगभरातील त्यांचे चाहते शोकसागरात बुडाले आहेत.

लता मंगेशकर यांच्या कारकिर्दीची सुरुवात १९४२ मध्ये होती आणि त्यांची कारकीर्द सहा दशकांपेक्षा अधिक काळ टिकून होती. त्यांनी ९०० पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली होती. तसेच २० पेक्षा जास्त प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये गायन केले होते. लता मंगेशकर यांचे संपूर्ण कुटुंबच संगीतासाठी प्रसिद्ध आहे. सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर आणि ख्यातनाम संगीतकार-गायक हृदयनाथ मंगेशकर ही त्यांची सख्खी भावंडे आहेत. लता मंगेशकरांचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर हे मराठी नाट्य-संगीताचे प्रसिद्ध गायक होते.

लतादीदींच्या निधनानंतर  खासदार शरद पवार यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. ते म्हणाले,  जगभरातील कोट्यवधी संगीतप्रेमींच्या कानांना तृप्त करणारे अलौकिक स्वर आज हरपले. लतादीदींच्या आवाजाच्या परीसस्पर्शाने अजरामर झालेल्या गीतांच्या माध्यमातून हा स्वर आता अनंतकाळ आपल्या मनांमध्ये गुंजन करत राहील. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली!