आपल्या कामातून शासन प्रशासन गतिमान आहे हा संदेश देऊया –  एकनाथ शिंदे

मुंबई – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचा तर उपमुख्यमंत्री म्हणून भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांचा काल शपथविधी झाला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना राजभवनामध्ये पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. लोकांनी आपल्यावर विश्वास दाखवला आहे. आपल्या कामातून शासन प्रशासन गतिमान आहे हा संदेश देऊया, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शपथ ग्रहणानंतर केलं.

मंत्रालयात मंत्रिमंडळ बैठकीनंतर सचिव आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. तर आपल्यासोबत पुन्हा काम करण्याची संधी मिळाली आहे; गतिशीलतेने आणि निर्णय क्षमतेने महाराष्ट्र पुढे नेऊया असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं.

दरम्यान मंत्रिमंडळ बैठकीत उद्या आणि परवा विधिमंडळाचं विशेष अधिवेशन घेण्याचा निर्णय घेण्यात आला. अधिवेशनात पहिल्याच दिवशी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार असून राज्यपालांनी शिंदे सरकारला उद्याच बहुमत सिद्ध करण्यास सांगितलं आहे. कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील खरीप हंगाम पीक पाणी, पीक विमा आणि राज्यातील कोरोना प्रादुर्भावाबाबतच्या परिस्थितीचं सादरीकरण करण्यात आलं.