पंतप्रधान मोदी ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधणार 

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 एप्रिल रोजी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. ‘परीक्षा पे चर्चा’ची ही पाचवी आवृत्ती असेल. या कार्यक्रमाबाबत शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन यासंबंधीची महत्त्वाची माहिती दिली.

धर्मेंद्र प्रधान म्हणाले, “परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाची पाचवी आवृत्ती 1 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर आयोजित केली जाईल. यात इयत्ता 9वी ते 12वी पर्यंतचे 1 हजार विद्यार्थी सहभागी होतील.”; ते म्हणाले की दिल्ली-एनसीआर, यूपी आणि हरियाणातील सरकारी आणि खाजगी शाळांमध्ये शिकणारी बहुतेक मुले या कार्यक्रमात सहभागी होतील. कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपणही होणार आहे.

यावेळी विशेष बाब म्हणजे भारताचे सर्व राज्यपाल राजभवनात विद्यार्थी आणि शिक्षकांसोबत परिक्षा पे चर्चा कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, यासोबतच भारतीय लोक मोठ्या संख्येने राहत असलेल्या देशांतील दूतावासांमध्ये हा कार्यक्रम दाखवला जाईल. केंद्रीय उच्च शैक्षणिक संस्थांमध्येही हा कार्यक्रम आयोजित केला जाईल.