महाराष्ट्र केसरी शिवराज १५ व्या वर्षीच सोडणार होता कुस्ती, स्वत:चं सांगितलं काय घडलं होतं

पुणे : पैलवान शिवराज राक्षेने (shivraj rakshe ) पैलवान महेंद्र गायकवाड (mahendra gaikwad) याला चीतपट करत प्रतिष्ठेच्या ‘महराष्ट्र केसरीची गदा’ पटकावली. शिवराज राक्षेच्या रूपाने महाराष्ट्राला नवा ‘महाराष्ट्र केसरी’ मिळाला. स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या महेंद्र गायकवाड याला उपमहाराष्ट्र केसरीवर समाधान मानावे लागले.

दरम्यान, कुस्तीपटूंच्या जीवनात अनेक उतार-चढाव येत असतात, अनेक विविध प्रसंगांना त्यांना सामोरे जावे लागते. असाच एक कुस्ती सोडावी लागेल असा प्रसंग शिवराज राक्षेच्या जीवनात आला होता. याबाबत त्याने एबीपी माझा या वृत्तवाहिनीसोबत बोलताना खुलासा केला आहे.
वयाच्या १५व्या वर्षीच कुस्ती सोडण्याचा विचार शिवराजच्या मनात डोकावून गेला होता आणि यामागील कारण होतं त्याला झालेली जबर दुखापत. तो १५ वर्षांचा असताना कुस्ती खेळत होता आणि त्या कुस्तीदरम्यान त्याच्या जबड्याचं हाडं मोडलं होतं.

या जबर दुखापतीचा प्रसंग सांगताना शिवराज म्हणाला, ‘कुस्ती खेळताना मला अचानक दुखापत झाली आणि माझं जबड्याचं हाडं मोडलं होता. मी तेव्हा १५ वर्षांचा होतो दोन महिने मला जबडाही उघडता येत नव्हता त्यामुळे मी फक्त ज्यूस प्यायचो. या दुखापतीनंतर मला वाटलं पैलवानकी नको, पण आई, वडील आणि भावाने नेहमीच धीर दिला, मला कधी खचू दिलं नाही. त्यांच्या प्रोत्साहनामुळे आज मी इथपर्यंत पोहोचलो आहे.’