मुख्यमंत्री म्हणून सुप्रियाताईच्या नावाला मग काँग्रेस तयार होईल का? अजितदादा काय भुमिका घेतील?

राम कुलकर्णी –  ठाकरे शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी राजकारणाची स्ट्रॅटेजी म्हणुन दोन दिवसापुर्वी मुख्यमंत्री पदाबाबत भविष्य वर्तवुन टाकले. ते म्हणाले, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आगामी काळात महिला होईल. कोण होणार? किंवा कोणत्या पक्षातुन होणार? हे सांगितलं नसलं तरी शिवसेनेत महिला नेतृत्वाची असलेली कमतरता लक्षात घेता कदाचित त्यांच्या या वाक्यामागे अदृश्य हात निश्चित असु शकतो. पण पक्षात अवसान नसताना हात्तीच्या बळाची भाषा बोलणे कदाचित राहिलेल्या कमकुवत पक्षाला बळ भरण्यासाठी समजुन घेवु. ठाकरेंनी महाविकास आघाडी सोडलेली नाही. अडीच वर्षापुर्वी सत्तेसाठी बांधलेली गाठ सद्या तरी कायम आहे. त्यांच्याकडे केवळ 16 आमदार शिल्लक असुन शिवसेना फुटल्यामुळे 24 ला किती येतील? सांगणे अवघड. एकुण त्यांच्या घोषणेचा रंग पहाता कदाचित महाविकास आघाडी पुन्हा सत्तेवर येईल असे स्वप्न पडत असतील आणि आली तर सुप्रियाताई सुळे यांनाच त्यांना पाठिंबा द्यावा लागेल. एव्हाना तेच नाव डोळ्यासमोर असेलही. सिल्वर बंगल्याला खुश करण्यासाठी कदाचित त्यांनी आवई सोडली असं समजायला हरकत नाही.

मुळ शिवसेनेचे दोन तुकडे झाल्यानंतर शिल्लक ठाकरे शिवसेना अगदी बोटावर मोजण्या इतपतच आकडेवारी त्यांच्याकडे आहे. एक नव्हे दोन नव्हे तब्बल 40 आमदार आणि डझनभर खासदार बाहेर पडलेले आहेत. राजकिय भुकंपानंतर ठाकरे कुटुंब पॅचअप करण्यासाठी महाराष्ट्रभर फिरत असले तरी आगामी काळात फार उभारी घेण्याइतपत अवसान पुन्हा मिळेलच असं नव्हे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला रोज वाढत असलेली ताकद आणि राज्यात मुख्यमंत्री म्हणुन सक्सेसफुल होत असलेलं नेतृत्व कदाचित बाळासाहेबांची शिवसेना एवढेच नव्हे तर हिंदुत्वाचे पाठीराखे म्हणुन पुन्हा हा गट सत्तेच्या राजकारणात प्रस्थापित होवु शकतो.

शिंदे गट बाहेर पडल्यानंतर सर्वसामान्य शिवसैनिक आणि जनतेनं त्यांचे स्वागत केलं. कारण उद्धव ठाकरेंनी 2019 ला मतदारांनी दिलेल्या जनाधाराचा अवमान करून केवळ मुख्यमंत्री पदासाठी संजय उवाच मध्यस्थीने महाविकास आघाडीची स्थापना करून सत्ता बळकावली. स्व.शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वैचारिक विचार आणि हिंदुत्वाची भुमिका जणु काही मातोश्री बाहेरच्या समुद्रात फेकुन दिली. एवढेच नव्हे तर ठाकरेंचं राजकारण तीन वर्षापासुन महाराष्ट्र पहातो. मतांसाठी लांगुनचालन आणि सत्तेत असताना भ्रष्टाचाराने पोसलेले सहकारी पक्ष. शरदचंद्र पवारांच्या नादाला लागुन मुळात उद्धव ठाकरेंनी राजकिय आत्मघात करून घेतला असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.

वर्तमान राजकिय अस्तित्व  टिकवण्यासाठी ठाकरे कुटुंबियांना बाहेर पडावं लागलं. पक्षात पसरलेला अंधार दुर करण्यासाठी ज्यांनी स्व.बाळासाहेब ठाकरेंनाही विरोध केला. अशा अंधारेंना पक्षात बोलावुन राजकिय मैदानात सोडलं. अनेक प्रकारचे प्रयोग ठाकरे पिता-पुत्र राज्यात करताना दिसतात. संजय राऊत 100 दिवसाचा मुक्काम ठोकुन पुन्हा आले. रोज त्यांची सुरू असलेली टिवटिव ज्याला अगोदरच महाराष्ट्र वैतागुन गेलेला होता. सद्यस्थितीत ठाकरे शिवसेनेचं चाललंय काय? तर गोंधळ आणि संभ्रम याशिवाय दुसरं काहीच नाही. उठसुठ शिंदे-फडणवीस सरकारवर आरोप करायचे. विरोधाला विरोध म्हणुन शब्दफेक करत रहायचं. दुसरा उद्योग काहीच नाही म्हणुन स्वत: उद्योग सांभाळता आले नाही तथा उद्योगवाल्यांना प्रोत्साहित केले नाही. एकुणच काय टक्केवारी, कमिशन या नादात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताच बाहेरच्या राज्यात उद्योगवाले परतायला सुरूवात झाली होती. राजकारण वैचारिक करावं लागतं आणि त्यावर नेतृत्वाची कडवी नजर लागते. सत्ता असुन अडीच वर्षात शिवसेना संपवण्यासाठी खा.संजय राऊतांचा असलेला सिंहाचा वाटा त्यात कमी होते की काय? म्हणुन आता अगोदर पक्षात आयुष्य घालणार्‍या महिला नेतृत्वाला बाजुला ठेवुन सुषमाताईंच्या हाती मशाल दिली. कदाचित तिथेही माशी शिंकली ज्यामुळे शिवसेनेत महिला नेतृत्व प्रचंड नाराज असल्याचे बोलल्या जाते.

खरं तर त्यांचा तो अंतर्गत प्रश्न पण चार दिवसापुर्वी उद्धव ठाकरेंनी भविष्यात महिला मुख्यमंत्री करणार असल्याचे संकेत दिले. प्रमुखांनी केलेली घोषणा त्यानंतर वेगवेगळे अंदाज तर्कवितर्क मातोश्री भोवतीच घुमताना दिसतात. या बोलण्याकडे बारकाईने जर पाहिलं तर उद्धव ठाकरे कशाच्या बळावर महिला मुख्यमंत्री करतील? हाच पहिला प्रश्न. कुणाला करतील? ती गोष्ट लांबच. पण ज्यांची राजकिय अवस्था अवसानगलित गात्र झाली आमदार, खासदार फुटुन बाहेर पडले. भविष्य वर्तवता येईल एवढीही ताकद राहिली नाही. मग असं ते का बोलले? दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या पक्षात महिला नेतृत्व मुख्यमंत्री पदापर्यंत जाणारं कोण? हा देखील संशोधनाचा प्रश्न उपस्थित होवु शकतो. पण एक गोष्ट निश्चित आहे महिला मुख्यमंत्री आम्ही करणार उद्धव ठाकरेंच्या या संकेतामागे अदृश्य शक्ती शोधण्याचा जर प्रयत्न केला तर सिल्वर बंगल्यावर संशय निश्चित जावु शकतो.

महाराष्ट्राचं राजकारण भविष्यात करायचं असेल आणि राहिलेल्या शिल्लक शिवसेनेला पुन्हा उत्सर्जित करायचं असेल तर उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीची साथ सोडता येणार नाही. भलेही सोनिया काँग्रेस अर्थात नाना पटोले सोबत राहतील का नाही? यात शंका पण राष्ट्रवादी शिवसेना आणि अलीकडेच डॉ.प्रकाश आंबेडकर यांच्याशी वाढलेली जवळीक. कदाचित हीच महाविकास आघाडी होवु शकेल आणि मग पिता म्हणुन जे शरदचंद्रजी पवार यांचं स्वप्न की आपल्या मुलीला मुख्यमंत्री पदावर बसवणं. कदाचित हा सिंहासन सोहळा उद्धव ठाकरे यांच्या तोंडी घालुन एक महिला मुख्यमंत्री पदी बसवण्याचा खटाटोप म्हणजे सुप्रियाताई सुळे असु शकतो असा राजकिय कयास बांधला तर चुकीचं ठरणार नाही. तशाच प्रकारची वाटचाल ठाकरे शिवसेनेची महाराष्ट्राच्या राजकारणात सद्या सुरू आहे. महिला मुख्यमंंत्री पदाची त्यांची घोषणा केवळ नाव न जाहिर करता करणं याचाच अर्थ अदृश्य शक्ती म्हणून मोठ्या पवार साहेबांच्या ईशार्‍यावर केलेली घोषणा निश्चित असु शकते.

आता सुप्रियाताईच्या नावाला मग काँग्रेस तयार होईल का? एवढेच नाही तर अजित दादा काय भुमिका घेतील? असे अनेक संकटे समोर असले तरी रिकाम्या डबक्यात पोहण्याचा हा प्रयत्न ज्याची कीव लोकांना येवू लागली. राजकारणात कोणत्या वेळी काय नेते बोलतील? आणि कुठला अंदाज कुठे काढतील? हे कुणी सांगु शकत नाही. फुटलेली शिवसेना पॅचअप करायला एक-दोन वर्षे नव्हे किमान दहा वर्षापेक्षा जास्त कालावधी लागु शकतो. तोपर्यंत पुलाखालुन पाणी वाहुन जाणारंच. दुसर्‍या बाजुने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्तेचा घोडा महाराष्ट्राच्या राजकारणात सुसाट वेगाने सुटलेला आहे. चार महिन्यात सत्ता चालवताना या जोडीने अनेक जनतेच्या हिताचे निर्णय घेतले. सरकार कसं पारदर्शक काम करतं? हे प्रत्यक्ष दाखवत आहेत. शेतकरी, कष्टकरी, समाजातील वंचित, उपेक्षित लोकांच्यासाठी सत्ता चालवावी लागते हे सद्याच्या भाजप-शिंदे गटाच्या सरकार वरून निश्चित लक्षात येतं. बहुमताचा आकडा सत्ता चालवण्यासाठी आहेच. पण आगामी काळात 200 आसपास 2024 निश्चित जाईल यात शंका वाटत नाही. एकुण पार्श्वभुमी पहाता उद्धव ठाकरे यांची राजकियदृष्ट्या सुरू असलेली धडपड आणि भविष्यवाणीमध्ये महिला मुख्यमंत्री कोण? तर बारामतीच्या लेकीचं नाव डोळ्यासमोर आल्याशिवाय रहात नाही हे नक्की.