महागाईच्या मुद्द्यावर महिला काँग्रेसने मोदी सरकारला जाब विचारावा :- नाना पटोले

मुंबई: नारीशक्ती ही मोठी शक्ती असून महिलांची लोकसंख्या ५० टक्के आहे. महिलांनी मतदानात सक्रीय सहभाग घेतला तर मोदी सरकारचा पराभव अटळ आहे. मोदी सरकारच्या काळात महागाई प्रचंड वाढली असून या महागाईचा सामना सर्वात आधी महिलांना करावा लागतो. महागाईने जगणे कठीण झाले आहे. महागाईच्या मुद्द्यावर महिला काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत केंद्रातील मोदी सरकारला जाब विचारला पाहिजे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या कार्यकारिणीची बैठक टिळक भवन येथे पार पडली. या बैठकीला नाना पटोले मार्गदर्शन करत होते. महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा नेट्टा डिसुझा, महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे व राज्यभरातील महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

यावेळी बोलताना नाना पटोले पुढे म्हणाले की, काँग्रेस पक्षात महिलांना सन्मान दिला जातो, इंदिराजी गांधी या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या तर सोनियाजी गांधी यांना पंतप्रधान बनण्याची संधी चालून आली होती पण त्यांनी ते पद नाकारले, त्या त्यागमूर्ती आहेत. तुम्ही पहिला काँग्रेसच्या पदाधिकारी आहेत ही तुमची मोठी ओळख आहे. या पदाचा वापर काँग्रेस पक्ष संघटन वाढवण्यासाठी करा. महागाईचा मुद्दा हे मोठे शस्त्र तुमच्या हातात आहे, त्यावर सरकारविरोधात आंदोलन केले पाहिजे. मुंबई व महाराष्ट्रात महिला अत्याचाराच्या घटना वाढलेल्या आहेत त्यावर आवाज उठवला पाहिजे. तुम्ही कमजोर समजू नका, तुमच्यातला न्यूयगंड काढून टाका. लोकसभा व विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कामाला लागा आणि दिल्लीतल्या मोदी सरकारचा पराभव करा, असे आवाहन पटोले यांनी केले.