‘वंचित’सोबत आघाडीच्या प्रस्तावाबाबत शरद पवार  याचं लक्ष्यवेधी वक्तव्य, म्हणाले… 

मुंबई- काही दिवसांपूर्वीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडी या पक्षांमध्ये युती झाली. या युतीनंतर राज्यात पुन्हा शिवशक्ती आणि भिमशक्ती एकत्र आल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा शिवसेना पक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासमवेत महाविकास आघाडीचा घटक आहे. त्यामुळे या युतीवरुन महाविकास आघाडीत धुसफूस सुरू आहे.

अशातच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबद्दल खळबळजनक (Prakash Ambedkar On Sharad Pawar) विधान केले आहे. शरद पवार हे आजही भाजपासोबत आहेत असा दावा  प्रकाश आंबेडकर यांनी केल्याने राज्यात नव्या चर्चांना तोंड फुटले आहे. तसेच आमचा महाविकास आघाडीशी काहीही संबंध नाही. आमची युती ही शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंशी आहे, असेही यावेळी प्रकाश आंबेडकरांनी म्हटले आहे.

दरम्यान, या सर्व प्रकारामुळे महाविकास आघाडी ‘वंचित’ला सामावून घेणार का, असा प्रश्न सध्या विचारण्यात येत आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केले आहे. शरद पवार म्हणाले,  वंचित बहुजन आघाडीची ठाकरेंच्या शिवसेनेशी युती झाली आहे. वंचितसोबत आघाडीचा प्रस्ताव आमचा नाही असे पवार म्हणाले.

तसेच तुमच्यावरून ठाकरे गट आणि आंबेडकर यांच्यात वाद असल्याचं चित्रं आहे, याकडे शरद पवार यांचं लक्ष वेधलं. त्यावर पवार यांनी थेट उत्तर दिलं. त्या दोघात वाद आहे की नाही, हे मला माहीत नाही, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं.आमच्या आजवर ज्या चर्चा झाल्यात त्यानुसार ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढणार असल्याचं ठरलं आहे, असं पवार यांनी स्पष्ट केलं आहे. पवारांच्या या विधानामुळे आंबेडकर यांचं टेन्शन वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.