मणिपूर : मैतेई आणि कुकी समाजानं हिंसाचार बंद करावा आणि सरकारबरोबर चर्चेसाठी पुढे यावं

Amit Shah : लोकसभेत सरकारच्या विरोधात विरोधकांनी आणलेल्या अविश्वासाच्या ठरावावर आज चर्चा सुरु राहणार आहे. काल ठरावावरील चर्चेच्या दुसऱ्या दिवशी गृहमंत्री अमित शहा (Amit Shah)  यांनी सरकारची बाजू मांडली. मणिपूर मधल्या घटनांचं दु:ख सर्वांनाच आहे. या घटना दुर्दैवी आहेत मात्र त्यावरून राजकारण करणं हे अधिक दुर्दैवी आहे, असं शहा म्हणाले.

मणिपूरमध्ये उसळलेला वांशिक हिंसाचार त्यावेळच्या परिस्थितीशी निगडित आहे आणि त्याचा राजकारणाशी संबंध जोडण्याची गरज नाही. मणिपूरमध्ये 3 मे पासून 152 लोकांनी आपला जीव गमावला आहे. मणिपूरमधल्या मैतेई आणि कुकी समाजानं हिंसाचार बंद करावा आणि सरकारबरोबर चर्चा करण्यासाठी एकत्र पुढे यावं, असं आवाहन शहा यांनी केलं.

या दोन्ही समाजाशी आपण स्वतंत्ररीत्या चर्चा करत असल्याची माहिती त्यांनी दिली. काल चर्चेत भाग घेताना काँग्रेसच्या राहुल गांधी यांनी सरकार मणिपूरचे तुकडे पाडत असल्याचा आरोप केला. या आरोपाचं खंडन करताना महिला आणि बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांनी मणिपूर हा भारताचा अविभाज्य भाग असून मणिपूरचे तुकडे कधी पडले नाहीत आणि पडणारही नाहीत यावर जोर दिला.

मणिपूरमध्ये सर्व घटकांनी शांतता राखावी, असा ठराव काल लोकसभेत मांडण्यात आला. आपली बाजू मांडल्यानंतर शहा यांनी सभापती ओम बिर्ला यांनी हा ठराव वाचून दाखवावा, अशी सूचना मांडली. या ठरावाला सर्वांनी पाठिंबा दर्शवला. यानंतर लोकसभेचं कालच्या दिवसाचं कामकाज संपलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज लोकसभेत अविश्वासाच्या ठरावाला उत्तर देणार आहेत.