बंडातात्यांचं अशा प्रकारचं बोलणं आम्ही खपवून घेणार नाही – नवनीत राणा

मुंबई : साताऱ्यामध्ये बंडातात्या कराडकर यांनी वाईन विक्रीच्या विरोधात आंदोलन केलं होतं. या आंदोलनादरम्यान त्यांनी सुप्रिया सुळे तसेच पंकजा मुंडे या दारू पितात असा थेट आरोप केला आहे. सुप्रिया सुळे राजकारणात येण्यापूर्वी त्यांचे दारू पिऊन रस्त्यावर पडलेले फोटो तुम्हांला ढीगाने सापडतील असा दावा बंडातात्या कराडकर यांनी केला आहे.

साताऱ्यात बंडातात्या कराडकर यांच्या व्यसनमुक्त युवक संघाच्या वतीने दंडवत दंडुका आंदोलन करण्यात आलं. यावेळी बोलत असताना बंडातात्या कराडकर यांनी नेत्यांची मुलं रस्त्यावर दारू पिऊन पडत असल्याचे पुरावे आहेत असं म्हटलं आहे.

एवढंच नाही तर कराडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अजित पवारांची जोडी म्हणजे ढवळ्याशेजारी पोवळा बांधला वाण नाही पण गुण लागला अशी आहे असं म्हणत सरकारवरही टीका केली आहे. दारू विक्रीचा निर्णय अजितदादांचा, मंदिरं खुली करायची नाही, ज्ञानोबारायांचा सोहळा काढायचा नाही हा निर्णय अजितदादांचा आहे. मी हे जाहीरपणे सांगतो, मनमानी आणि दादागिरी अजितदादा करतात असं देखील ते म्हणाले.

दरम्यान, आता खासदार नवनीत राणा यांनी बंडातात्या यांच्या वक्तव्याचा समाचार घेतलाय. आम्ही वाईनच्या विरोधात आहोत. या निर्णयावर महाराष्ट्रातील आम्ही सगळ्या महिला विरोधात आहोत. पण बंडातात्या कराडकर यांचे महिलांबाबतचं वक्तव्य, अशा प्रकारचं बोलणं आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारा नवनीत राणा यांनी दिलाय.