“मासिक पाळीबद्दल वडिलांना आधी सांगितलं”, प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचं वक्तव्य

Atisha Naik Talk About menstruation : मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक असलेल्या अतिशा नाईक (Atisha Naik) यांनी नुकत्यात एका मुलाखतीत आपल्या वैयक्तिक आयुष्यातील महत्त्वाचे प्रसंग सांगितले आहेत. ‘इट्स मज्जा’ या युट्यूब चॅनेलला अतिशा नाईक यांनी मुलाखत दिली. या मुलाखतीत विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी दिलखुलासपणे उत्तरं दिली. यावेळी त्यांनी वडिलांसोबतच्या काही क्षणांना उजाळा दिला.

वडिलांबरोबरच्या एका प्रसंगाबद्दल सांगताना अतिशा म्हणाल्या, “मला मासिक पाळी आल्यानंतर मी सगळ्यात आधी माझ्या वडिलांना सांगितलं होतं. मी घाबरले होते. काय झालंय हे मला कळत नव्हतं. काय करायचं हे कळत नव्हतं. त्याला मासिक पाळी म्हणतात हेच मला माहीत नव्हतं. कारण, आपल्याकडे त्यादृष्टीने शिक्षण दिलं जात नाही. आता शिक्षणपद्धती बदलली आहे. या सगळ्या गोष्टींबद्दल आता शिक्षण दिलं जातं. पण, मला ते मिळालं नव्हतं. त्यामुळे हे काय झालंय, तेच मला कळत नव्हतं.”

वडिलांबरोबर चांगलं बाँडिंग असल्याने मी त्यांनाच ही गोष्ट सर्वात आधी सांगितली होती. त्यानंतर त्यांनी मला मी तुला याबद्दल जास्त काही सांगू शकणार नाही. आई तुला सांगेल, असं सांगितलं होतं. पण, काहीतरी बडबड करू नकोस, असं ते काहीच बोलले नाहीत. मला मासिक पाळीबद्दल वडिलांना सांगण्यात काहीच वाटलं नाही. मला वाटतं, हा विश्वास प्रत्येक नात्यात असायला हवा,” असं त्या म्हणाल्या.