… थोडी अधिक संधी हवी आहे, थोडा आपलेपणा… इतकेच; मेधा कुलकर्णी यांची आणखी एक पोस्ट

पुणे : पुण्यातील चांदणी चौकातील प्रकल्पाचे (Chandni Chowk Project) काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पाचे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या हस्ते नुकतेच उद्घाटन देखील पार पडले आहे. पुणे – बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे चांदणी चौकात सतत होणारी वाहतूककोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. मात्र या निमित्ताने भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई सुरु झाल्याचं पाहायला मिळाले.

कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी  (Medha Kulkarni ) यांनी याच मुद्द्यावरून स्थानिक भाजप नेत्यांवर तसेच अप्रत्यक्षपणे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला होता. यानंतर उलटसुलट चर्चा देखील सुरु झाल्या होत्या मात्र आता कुलकर्णी यांनी आणखी एक पोस्ट करून या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न  करत पाठींबा देणाऱ्या सर्वांचे आभार व्यक्त केले आहेत.
मेधा कुलकर्णी यांची पोस्ट
नमस्कार माझ्या प्रिय बंधू भगिनींनो,ही खास पोस्ट तुमच्यासाठी.. कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी..गेले दोन दिवस तुम्ही माझ्यावर जो प्रेमाचा, आपुलकीचा, विश्वासाचा वर्षाव केला त्याची मी सदैव ऋणी आहे. माझ्या राजकीय जीवनासंदर्भात ज्या गोष्टी घडल्या, गेली काही वर्ष साचलेल्या ह्या दुःखातील काही हे पर्वा प्रासंगिक निमित्ताने मांडले गेले. त्या माझ्या दुःखाशी तुम्ही समवेदना दर्शवली व आपल्या प्रतिक्रियांमधून आपली अनेक वर्षे जोडलेली नाळ कोणी अशी तोडू शकत नाही हे सिद्ध केलेत. पुण्यातील तसेच महाराष्ट्रातील कानाकोपर्‍यातूनही अनेकांनी पाठींबा दिला. या आशीर्वादाची शिदोरी खूप बळ देऊन गेली आहे. तुमच्या ऋणातून उतराई होणे शक्य नाही. सर्वांचे अगदी अगदी मनापासून आभार.

माझ्याबरोबर वर्षानुवर्ष काम करणाऱ्या माझ्या जुन्या जीवलग साथीदारांचे व माझी बाजू एका खुल्या मानाने ऐकून घेऊन माझ्या सत्याच्या लढाईत माझ्याबरोबर उभं राहणाऱ्या समस्त नागरिकांचे व भाजपाच्याही कार्यकर्त्यांचेही मी आभार मानते.

काल मा. नितीन गडकरी जी यांनी घरी येऊन विचारपूस केली, मा. देवेंद्र जी यांनी निरोप दिला. दोघेही पुढे वेळ देणार आहेत. समाजात आपल्या लोकांसाठी काम करून काहीतरी सकारात्मक बदल आणायची इच्छा आहे, थोडी अधिक संधी हवी आहे, थोडा आपलेपणा… इतकेच. काही समस्यांचे पक्षश्रेष्ठी काळजीपूर्वक निराकरण करतीलच.पण ही पोस्ट खास तुमच्याचसाठी. आपल्यासारख्या सुजाण नागरिकांचा पाठिंबा हीच माझी शक्ती. धन्यवाद!