नेमाडे यांना त्यांच्या घरी जाऊन अज्ञान पिठाचा पुरस्कार द्यायला हवा; मेधा कुलकर्णींची जोरदार टीका

भालचंद्र नेमाडे यांच्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल जोडे मारून निषेध; थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानच्या वतीने निषेध सभेचे आयोजन

पुणे : बाजीराव पेशव्यांचा विजय असो… नानासाहेब पेशव्यांचा विजय असो… भालचंद्र नेमाडे (Bhalchandra Nemade) यांचा धिक्कार असो…अशा घोषणा देत हिंदू म्हणून जगण्याची अडगळ वाटते का? असा प्रश्न करीत नेमाडे यांच्या पेशव्यांविषयीच्या वादग्रस्त विधानाचा निषेध करण्यात आला. यावेळी प्रतिकात्मक पद्धतीने जोडे मारो आणि पुस्तकांची होळी करण्यात आली.

थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानच्या वतीने ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिक डॉ.भालचंद्र नेमाडे यांच्या पेशव्यांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाबद्दल पूना हॉस्पीटल जवळील श्रीमंत नानासाहेब पेशवे समाधीस्थळ येथे निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी आमदार मेधा कुलकर्णी, इतिहासतज्ञ जगन्नाथ लडकत, मकरंद माणकिकर, पेशव्यांच्या वंशज आदिती अत्रे, प्रतिष्ठानचे सचिव कुंदनकुमार साठे, चिंतामणी क्षीरसागर, श्रीकांत नगरकर, ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे, परशुराम सेवा संघाचे अध्यक्ष विश्वजीत देशपांडे उपस्थित होते.

मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) म्हणाल्या, नेमाडे आणि त्यांच्यासारखी थोर महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारे लोक हे समाजातील लोकांची मने बोथट करण्याचे काम करीत आहेत. ब्राह्मण वर्गाने बुध्दी आणि ज्ञानासोबत शक्तीची उपासना केली पाहिजे. नेमाडे यांना त्यांच्या घरी जाऊन अज्ञान पिठाचा पुरस्कार द्यायला हवा.

दुसऱ्या कोणत्याही समाजावर असे शाब्दिक हल्ले झाले असते, तर त्या त्या समाजाने ते सहन केले असते का? आम्हाला सर्व राष्ट्र पुरुषांबद्दल अभिमान आहे. समाजातील सर्व लोक जेव्हा एक होऊ तेव्हा यांची जिरेल. वादग्रस्त विधान करणाऱ्यांना हिंदू म्हणून अडगळ वाटते का असा सवाल ही मेधा कुलकर्णी यांनी केला.

कुंदनकुमार साठे म्हणाले, साहित्यिक डॉ.भालचंद्र नेमाडे यांनी इतिहासाची मोडतोड करुन चुकीचा इतिहास मांडून क्रूरकर्मा औरंगजेबाच्या केलेल्या उदात्तीकरणाबद्दल तसेच पराक्रमी पेशव्यांबद्दल वादग्रस्त विधान केले. हे अत्यंत निषेधार्ह आहे. थोर महापुरुषांच्या विषयी केलेल्या वक्तव्यासाठी निषेध सभा घ्यावी लागते हे आपले दुर्दैव आहे, अशी खंतही साठे यांनी व्यक्त केली. जगन्नाथ लडकत आणि विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी मनोगते व्यक्त केली.