रजा मुराद यांनी दादा कोंडके यांना दिला तो फोन नंबर… आणि तो नंबर ऐकून दादांची झाली अशी अवस्था!

झी टॉकीज (Zee Talkies) वाहिनीवर सध्या दादा कोंडके (Dada Kondke) यांच्या गाजलेल्या चित्रपटांचा सीझन सुरू आहे. दादा कोंडके यांची ९१ वी जयंती मंगळवार ८ ऑगस्टला झाली. या निमित्ताने झी टॉकीज वाहिनीवर ६ ऑगस्टपासून दर रविवारी दादांचे ज्युबिलीस्टार चित्रपट प्रेक्षकांना पाहता येणार आहेत. येत्या रविवारी १३ ऑगस्टला ‘सासरचं धोतर’ हा चित्रपट दुपारी १२ आणि संध्याकाळी ६ वाजता झी टॉकीज वर पहायला मिळणार आहे. त्यांच्या काळात दादा कोंडके यांनी मराठी चित्रपटांप्रमाणेच अनेक हिंदी चित्रपटांची सुद्धा निर्मिती केली. त्यातलाच एक सुपर हिट चित्रपट म्हणजे ‘आगे की सोच’. या चित्रपटात बॉलीवूडमधील आघाडीच्या कलाकारांची फौज होती. त्या काळात हिंदीमध्ये नावाजलेले कलाकार दादांच्या एका फोनवर ‘आगे की सोच’ या चित्रपटात काम करायला तयार झाले. या चित्रपटातील दिग्गज अभिनेते रजा मुराद यांनी दादा कोंडके यांच्यासोबतची एक आठवण विडिओ द्वारे नुकतीच शेअर केली आहे. दादा कोंडके यांच्या चित्रपटांची इरसाल नावं ऐकून रजा मुरादही हसून लोटपोट झाले होते. ‘आगे की सोच’ सिनेमाचं पॅकअप झाल्यानंतर रजा मुराद यांनी दादांना एक फोन नंबर सांगितला. तो फोन नंबर ऐकून दादांची अशी अवस्था झाली की विचारायची सोय नाही. असं काय होतं त्या नंबरमध्ये, याचा खुलासा रजा मुराद यांनी नुकताच केला.

रजा मुराद (Raza Murad) आणि दादा कोंडके यांनी ‘आगे की सोच’ आणि ‘ले चल अपने संग’ या हिंदी चित्रपटात एकत्र काम केले आहे. हैदराबादमध्ये शूटिंगच्या निमित्ताने या दोघांची चांगलीच गट्टी जमली होती. त्यावेळचा एक किस्सा रजा मुराद यांनी आवर्जून सांगितला. रजा मुराद म्हणाले, “मला अजूनही आठवतं, आमची पहिली भेट ‘आगे की सोच’ या चित्रपटाच्या सेटवर झाली. दादा कोंडके यांनी त्यांच्या या चित्रपटात मला पोलीस अधिकाऱ्याची भूमिका दिली होती. त्यांच्या सहवासात राहून मी देखील मराठी भाषेतील काही इरसाल शब्द शिकलो होतो. मी सहज एकदा त्यांना विचारलं की दादा आता तुमच्या पुढच्या सिनेमाचं नाव काय असेल? तेव्हा ते त्यांच्या अवखळ अंदाजात मला म्हणाले होते की, माझ्या पुढच्या सिनेमाचं नाव असेल ‘एक रूपये मे दो की लो’. दादांच्या सिनेमातील नावांमध्येच विनोद दडलेला होता. ते ऐकून मी म्हणालो, आता मी तुम्हाला एक फोन नंबर सांगतो. तो तुम्ही तुमच्या नावावर नोंदवून घ्या. मी म्हणालो, २२ १७ १४. तेव्हा दादांनी त्यांच्या खास शैलीत हा फोन नंबर ‘दो दो एक सात चौदा’ असा उच्चारला आणि ते हसून हसून बेजार झाले. तो फोन नंबर उच्चारताना डोकावणारा अर्थ दादांना बरोब्बर कळला. दादांमधील हा मिश्किलपणा मला आजही त्यांच्यासोबत असल्याची जाणीव देतो.”

“दादा कोंडके हे मराठी चित्रपटांचे महारथी होते. ९ सिल्व्हर ज्युबिली चित्रपट, प्रचंड यश, प्रसिध्दी, वलय मिळवूनही त्यांच्या डोक्यात यशाची हवा कधीच गेली नव्हती. त्यांचा साधेपणा कायम आवडायचा. माझ्यासोबत मराठी, हिंदीतील एक यशस्वी अभिनेता, निर्माता आहे असं कधीच वाटलं नाही ते त्यांच्या साधेपणामुळेच. बंडी, नाडीची चड्डी, त्यांच्या केसांची स्टाइल, मिशीचा कट हे सगळच भन्नाट होतं. ते नायक म्हणून जसे पडद्यावर दिसायचे तसेच खऱ्या आयुष्यात होते.”

“दादांचा दिलखुलासपणा त्यांच्या नसानसात भिनला होता. अशा अत्यंत कलासक्त, संवेदनशील व्यक्तीचा सहवास अजून लाभायला हवा होता. दादा खूप लवकर या जगातून गेले. ६५ हे काही त्यांचं जग सोडून जाण्याचं वय नव्हतं. ‘एकटा जीव सदाशिव’ हा चित्रपट जसा होता तसं त्यांचं जीवन होतं. पण तो एकटेपणा त्यांनी स्वतःपुरता ठेवला. जेव्हा ते सर्वांसोबत असायचे तेव्हा फक्त आणि फक्त इतरांना आनंदच द्यायचे. झी टॉकीजने दादा कोंडके यांच्या चित्रपटांची मेजवानी प्रेक्षकांसाठी आणली ही खूप चांगली गोष्ट आहे. दादांचे चित्रपट आता थिएटरला दिसत नाहीत, पण आजच्या पिढीला दादा कोंडके यांचे चित्रपट दाखवण्याची झी टॉकीजची कल्पना खूपच स्तुत्य आहे.” येत्या रविवारी ऑगस्टला ‘सासरचं धोतर’ हा चित्रपट दुपारी १२ आणि संध्याकाळी ६ वाजता झी टॉकीज वर प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.