तिरंग्याच्या नावावर भाजपची धंदेबाजी सुरु आहे; हर घर तिरंगा मोहिमेवरून मिटकरींचा घणाघात 

Akola –  स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाअंतर्गत ‘हर घर तिरंगा’ (Har Ghar tiranga campaign) हा उपक्रम देशभर राबवण्यात येत आहे.या उपक्रमाला जम्मू-काश्मीर या तणावग्रस्त भागातही मोठा प्रतिसाद मिळत आहे. मोठ्या संख्येने येथील नागरिक या उपक्रमात सहभाग नोंदवत आहे.

येत्या १५ ऑगस्टला देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होणार आहेत. देशभरातील सामान्य नागरिक, राजकीय नेते आणि जवान एकत्रितपणे हा उपक्रम राबवताना दिसत आहेत. मात्र मोदी सरकारच्या ‘हर घर तिरंगा’ मोहिमेवरून राजकारण सुरू झाले आहे. या प्रचारासाठी भाजपने जोरदार प्रचार सुरू केला असतानाच काँग्रेसने  आणि विरोधकांनी मात्र या मोहिमेपासून स्वतःला दूर ठेवले आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari)यांनी तोफ डागली आहे. भाजप तिरंग्याच्या आडून व्यावसायिक हित जोपासत (BJP commercial policy)असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. मोदी सरकार वारंवार राज्यघटनेचा अपमान करत आहे. अशोक चिन्हाचा त्यांनी अनादर केला आहे. आता तिरंग्याच्या नावावर धंदेबाजी सुरु असल्याचा घणाघात त्यांनी घातला. तिरंग्याच्या किंमतीवर सवाल उठवत कुठे 25 तर कुठे 30 रुपयांचा तिरंगा खरेदी करावा लागत असून यातून कोट्यवधींची उलाढाल होणार आहे. देशात मूलभूत प्रश्न तसेच असताना आझादी का पर्व कसा साजरा करता येऊ शकतो, असा सवाल ही त्यांनी विचारला.