गॅस दरवाढीवरुन महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक; विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत जोरदार घोषणाबाजी…

मुंबई – होळी रे होळी, सरकारने थापली गॅस दरवाढीची पोळी… संपला निवडणूकीचा तडाका, झाला गॅस दरवाढीचा भडका… रद्द करा रद्द करा… गॅस दरवाढ रद्द करा… खोके सरकार आले सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले… खोके सरकार आले गॅस दरवाढीचे विघ्न आणले… पुण्यात नाही चालले खोके उदास झाले बोके…या सरकारचं करायचं काय, गरीबांच्या घरात जेवण नाय… शेतकऱ्यांची लाईट तोडणाऱ्या सरकारचा धिक्कार असो… बळीराजाला द्या लाईट नाहीतर शेतकरी देईल फाईट.. महाराष्ट्राला द्या लाईट नाहीतर शेतकरी करतील टाईट… अशा गगनभेदी घोषणांनी महाविकास आघाडीच्या (MVA) आमदारांनी विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला.

अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit pawar) आणि अंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्या नेतृत्वाखाली गॅस दरवाढ (Gas Price  Hike) विरोधात महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत शिंदे सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawanule) यांचे बॅनर फडकवून निषेध केला .