‘अब किस किस सीतम कि मिसाल दु तुमको”, तुम तो हर सीतम बेमिसाल करते हो’ 

मुंबई – “अब किस किस सीतम कि मिसाल दु तुमको”, तुम तो हर सीतम बेमिसाल करते हो’, या गालिबच्या शायरीतून राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी गॅस दरवाढीवरुन (Gas Price Hike) मोदी सरकारवर (Modi Government) निशाणा साधला आहे.

गेल्या वर्षात चारवेळा घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाली असताना यावर्षीही होळी सणाच्या सुरुवातीला घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत ५० रुपयांनी तर व्यावसायिक गॅसमध्ये ३५० रुपयांची दरवाढ मोदी सरकारने केली आहे याबद्दल महेश तपासे यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे.

घरगुतीसह व्यावसायिक वापरातही गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिकांना महागाईचा सामना करावा लागत आहे. गॅस सिलेंडरच्या दरवाढीमुळे टपरीवर मिळणाऱ्या चहाचा दर दुप्पट होणार आहे. तर हॉटेलमधील खाद्य पदार्थावरील दरही सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर जाणार आहे. दुसरीकडे देशाचा विकास दर गेल्या वर्षाच्या तुलनेत आणखी कमी झाल्याने देशात महागाई आणि बेरोजगारी वाढली आहे. मात्र यावर केंद्रातील मोदी सरकार काहीच बोलत नाही, असाही हल्लाबोल महेश तपासे यांनी केला आहे.

सततची गॅस दरवाढ आणि सबसिडी बंद झाल्याने महिलांना गॅस बंद करून पुन्हा चुली पेटवाव्या लागल्या आहेत. त्यामुळे उज्ज्वला योजना फोल ठरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सुरुवातीलाच ३५० रुपयात मिळणारा गॅस आता ११०० रूपये झाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांचे आर्थिक नियोजन आवाक्याबाहेर गेले आहे असेही महेश तपासे म्हणाले.