मोदी सरकारला पेट्रोलजन्य पदार्थांच्या किमती वाढवण्याचे नैतिक अधिकार नाही – राष्ट्रवादी 

मुंबई – देशाचा विकास दर वाढत नसून फक्त महागाई वाढत आहे असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी मोदी सरकारला लगावला. युक्रेन रशिया युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चा तेलाचा दर जवळपास $140 प्रति बॅरेल असा झाला असून लवकरच भारत सरकार पेट्रोलजन्य पदार्थांची मोठी दरवाढ करणार असे संकेत प्राप्त होत आहेत. उत्तर प्रदेश, पंजाब व इतर राज्यांच्या निवडणुकांचे निकाल घोषित होताच पेट्रोलजन्य पदार्थांची दरवाढ केंद्र सरकार घोषित करेल असे समजते.

गेल्या दोन वर्षाच्या कोरोना संकटामुळे सामान्य नागरिकांचं मोठं आर्थिक नुकसान झालेले आहे. आता कुठे निर्बंध शितील झाले असून लोकं आपापल्या कामकाजाला लागले आहेत. अशा परिस्थितीत एकाएकी पेट्रोलजन्य पदार्थांची दरवाढ झाल्यास सामान्य नागरिकांना त्याचा बोजा सोसावा लागेल असे महेश तपासे म्हणाले.

ज्या काळात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्च्या तेलाची किंमत कमी होतील तेव्हा मोदी सरकारने भारतामध्ये पेट्रोलियम पदार्थांचे दर कमी केले नाहीत आता कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आणि म्हणून पेट्रोलजन्य पदार्थ मध्ये दरवाढ करावी लागते असं म्हणण्याचा नैतिक अधिकार मोदी सरकारला राहिला नाही असे महेश तपासे यांनी स्पष्ट केले.