‘ही’ आहे जगातील सर्वात महागडी भाजी, एक किलोची किंमत इतकी की नवीकोरी बाईक येईल

Expensive Vegetable: रोज स्वयंपाकासाठी भाजीपाला, फळभाज्यांचा वापर होतो. बाजारात टोमॅटो, कांदा, बटाटा, मेथी, पालक, इत्यादी भाज्या खरेदी करताना स्त्रिया त्यांच्या किंमतींवरून दुकानदाराशी भांडताना दिसतात. अगदी १ किलो भाजीची किंमत ३० किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास ती भाजी विकत घ्यायला स्त्रिया विचार करतात. अशातच जर एखाद्या भाजीची किंमत हजारोंमध्ये आहे असे सांगितल्यास अधिकांश लोकांना त्यावर विश्वास बसणार नाही.

पण बाजारात एक अशी भाजी उपलब्ध आहे, जी इतकी महाग आहे की त्या किंमतीत तुम्ही नवीकोरी बाईक विकत घेऊ शकता. होय, ही भाजी जगातील सर्वात महागडी भाजी आहे. या भाजीचे नाव काय आहे? तिची किंमत किती आहे? आणि ती भाजी इतकी महाग असण्यामागचे कारण काय आहे?, हे आम्ही तुम्हाला इथे सांगणार आहोत.

आपण ज्या भाजीबद्दल बोलत आहोत, तिचे नाव आहे ‘हॉप शूट्स’ (Hop Shoots). युरोपियन देशांमध्ये प्रसिद्ध असलेल्या या भाजीची गणना जगातील सर्वात महाग भाज्यांमध्ये केली जाते. या भाजीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. भारतात त्याची लागवड केली जात नव्हती, परंतु हिमाचल प्रदेशात प्रथमच या भाजीची लागवड करण्यात आली होती. या भाजीची किंमत सुमारे ८५,००० रुपये प्रति किलो आहे.

महागड्या दरामागे हे कारण आहे
माध्यमांतील वृत्तांनुसार, हॉप शूट्सची लागवड आणि कापणी खूप क्लिष्ट आहे. त्यासाठी खूप शारीरिक श्रम करावे लागतात. या सर्व कारणांमुळे त्याची किंमत खूप जास्त आहे. त्याची लागवड फार कमी ठिकाणी केली जाते, त्यामुळे त्याचा तुटवडा कायम आहे. त्याच्या उच्च किंमतीमागे हे देखील एक कारण असू शकते.

भाजी कापणीसाठी तयार होण्यासाठी ३ वर्षे लागतात
ही भाजी एक बारमाही पर्वतीय वनस्पती आहे. युरोप आणि उत्तर अमेरिकेतील मूळ रहिवासी याला तण मानत असत, पण तसे नाही. वैज्ञानिकदृष्ट्या Humulus lupulus म्हणून ओळखली जाणारी, ही भाजी हेम्प कुटुंबातील कॅनॅबिस वनस्पतीची एक प्रजाती आहे. ही भाजी मध्यम गतीने ६ मीटर (१९ फूट ८ इंच) पर्यंत वाढू शकते आणि २० वर्षांपर्यंत जगू शकते. गार्डियनमधील एका अहवालानुसार, हॉप शूट्स काढणीसाठी तयार होण्यासाठी तीन वर्षे लागतात.