महामानवांच्या विचारावर आमच्या पक्षाची वाटचाल सुरू असून आमचे व्हिजन क्लीअर आहे – अजित पवार

Ajit Pawar:- यंत्रणा हलवण्याची ताकद असायला हवी. त्यादृष्टीने आमचे काम सुरू असून सार्वजनिक कामे झालीच पाहिजे. कुणाला सांगायचे असेल तर ते मी सांगेन असा शब्द देतानाच आरोग्य, कला, क्रीडा या सर्व बाबींकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत.सर्वसामान्य लोकांचे कल्याण या भूमिकेतून राष्ट्रवादी काँग्रेस काम करत आहे. जे वेगवेगळे विचार मांडत आहेत, टिका करत आहेत त्याला मी महत्व देत नाही. मी कामाला महत्त्व देतो. महामानवांच्या विचारावर आमच्या पक्षाची वाटचाल सुरू आहे. आमचे व्हिजन क्लीअर आहे. राज्यातील जनतेचा विकास हेच ध्येय घेऊन आम्ही काम करत आहोत असा शब्द राज्यातील जनतेला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कल्याण येथील भव्य कार्यकर्ता मेळाव्यात दिला.

सार्वजनिक काम घेऊन हक्काने या… वैयक्तिक काम थोडं थांबवा. लोकांच्या अडचणी सोडविण्यासाठी, बहुजनांच्या कल्याणासाठी सत्तेत गेलो आहोत. सर्वसामान्य माणसाच्या समस्या सोडवत आहोत असेही अजित पवार यावेळी म्हणाले.

वय झाल्यावर राजकारणात आणि इतर क्षेत्रात थांबायचे असते असा संकेत असतो परंतु काहीजण थांबायला तयार नाही. काहीजण हट्टीपणा करत आहेत. राजकारणात वयाची अट असते. मात्र वयाची ८० – ८४ ओलांडली तरी थांबायला तयार नाही. आम्ही आहोत ना सक्षम, आम्हाला मार्गदर्शन करा ना, मी कित्येक वर्षे सत्तेत काम करत आलो आहे असा टोलाही अजित पवार यांनी नाव न घेता लगावला.

देशासमोर राज्यासमोर काय प्रश्न आहे हे लक्षात न घेता सध्या वाचाळवीरांची संख्या वाढली आहे. मुद्दयावर बोलणं सोडून इतर विषयावर बोलत आहेत. काहीजण मुंबईत येण्याची भाषा करत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानात आदेश सांगितला आहे. त्याचा आदर राखून राज्यातील, देशातील सरकार काम करत आहे परंतु कायदा हातात कुणी घेतला तर त्याचा मुलाहिजा राखला जाणार नाही असा इशाराही अजित पवार यांनी दिला.

मान आणि शान वाढविण्याचे काम मोदींच्या नेतृत्वाखाली झाले आहे. भारत देश प्रत्येक क्षेत्रात आगेकूच करत आहे. तरुण – तरुणींच्या हाताला काम कसे मिळेल असा प्रयत्न सुरु आहे. ८० कोटी जनतेला मोफत धान्य दिले जात आहे. घरकुल योजना राबवली जात आहे. काहींना नोकरी व काहींना व्यवसाय दिला जात आहे. शेतकऱ्यांना सहा हजार केंद्र व राज्यसरकार सहा हजार असे बारा हजार रुपये देत आहोत हेही अजित पवार यांनी आवर्जून सांगितले.

ठाणे जिल्हयाचा पाण्याचा प्रश्न लवकरच सोडवला जाणार आहे असे सांगतानाच ठाणे जिल्हा व ग्रामीण भागातील जी विकासकामे होत आहेत आणि केली जाणार आहेत त्या कामांची यादीच अजितदादा पवार यांनी यावेळी वाचून दाखवली.

आपल्याला बेरजेचे राजकारण करायचे आहे जे नवीन लोक पक्षात प्रवेश करणार आहेत त्यांच्यात आणि आपल्यात अंतर पडू देऊ नका. आपल्याला जातीपातीचे राजकारण करायचे नाही.अल्पसंख्याक समाजाला जास्तीत जास्त निधी देण्याचे काम केले आहे असेही अजित पवार यांनी सांगितले.

सत्तेतील सहभाग हा सत्ता उपभोगण्यासाठी नाही तर सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी – सुनिल तटकरे

सत्तेतील सहभाग हा सत्ता उपभोगण्यासाठी नाही तर सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी असतो हे आज दाखवून दिले आहे. आज अजितदादा तुमचे स्वागत ग्रामीण भागात झाले याचा अर्थ अजित तुम्ही जनतेच्या मनात स्थान निर्माण केले आहे आहे हे सिद्ध झाले अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी अजित पवार यांच्या निर्णयाचे कौतुक केले.

अजितच्या २ जुलैच्या निर्णयानंतर पहिल्यांदा कल्याणमध्ये हा भव्य मेळावा होत आहे त्याबद्दल सुनिल तटकरे यांनी कल्याण ग्रामीण भागातील जनतेला आणि कार्यकर्त्यांना धन्यवाद दिले.

बहुजनांच्या हितासाठी हा निर्णय घेतला. शाहू- फुले – आंबेडकर यांच्या विचारांशी फारकत न घेता नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जी देशाची प्रगती झाली आहे ती लक्षात घेता आणि बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे सांगतानाच आज जो भव्य मेळावा घेऊन राज्यातील जनता अजित पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे हे जाहीर झाले आहे असेही सुनिल तटकरे म्हणाले.

५३ पैकी ४३ आमदार अजित पवार यांच्या पाठीशी उभे राहिले हीच अजितदादांची ताकद आहे असेही सुनिल तटकरे यांनी आवर्जून सांगितले.

खोटारडी पीचएडी कुणाला द्यायची असेल तर ती म्हणजे टिव्हीवर वेडेवाकडे तोंड करणारे कोण हे जनतेला माहीत आहे मला त्याचे नाव घ्यायचे नाही असेही सुनिल तटकरे यांनी नाव न घेता समाचार घेतला.

वैचारिक लढाई लढायची असते त्यातून कार्यकर्ता घडतो. नारी शक्तीची ताकद चौथे महिला धोरण जाहीर करुन अदिती तटकरे हिने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली एक उत्तम काम केले आहे असे कौतुकही सुनिल तटकरे यांनी अदिती तटकरे यांचे केले.

या मेळाव्यात आमदार दौलत दरोडा, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव आदींनी आपले विचार मांडले.

यावेळी अनेक पक्षातील पदाधिकार्‍यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला.

कल्याण – मुरबाड मार्गावरील वरप गावात हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा पार पडला.

आगामी निवडणुकीची मोर्चेबांधणी आणि ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविण्याच्यादृष्टीने हा मेळावा महत्त्वाचा होता.

या मेळाव्याला उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, आमदार दौलत दरोडा, युवा नेते पार्थ पवार, ठाणे – पालघर जिल्हा समन्वयक आनंद परांजपे, कल्याण ग्रामीण जिल्हाध्यक्ष भरत गंगोत्री, प्रदेश सरचिटणीस आणि अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश निरीक्षक नजीब मुल्ला यांच्यासह रमेश हनुमंते, सोनिया धामी, किसनराव तारमाळे, प्रवीण खरात आदी प्रदेश पदाधिकारी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या-

Gangster Sharad Mohol | शरद मोहोळवर होता दहशतवाद्याला जेलमध्ये गळा दाबून मारल्याचा आरोप

Gangster Sharad Mohol | शरद मोहोळ प्रकरणावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले…

आता झोपेतही वजन कमी करता येणार! जाणून घ्या Weight Lossच्या सोप्या टिप्स

ओबीसींच्या न्याय हक्कांसाठी आपल्याला मंत्रीपदच काय आमदारकीची सुद्धा फिकीर नाही – मंत्री भुजबळ