खासदार अमोल कोल्हे यांची भाजपाशी वाढती जवळीक; राष्ट्रवादीसाठी धोक्याची घंटा

पुणे  – शिरुर लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे ‘स्ट्रार’ खासदार गेल्या काही दिवसांपासून ‘सेफ पॉलिटिक्स’ करीत आहेत. केंद्रातील आणि राज्यातील सत्ताधारी भाजपाशी त्यांनी जवळीक वाढवली असून, राष्ट्रवादी काँग्रेससाठी ही धोक्याची घंटा आहे. परिणामी, २०२४ मध्ये शिरुरची राजकीय समीकरणे बदलणार हे निश्चित झाले आहे.

माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, प्रचंड मोदी लाटेत २०१९ मध्ये झालेल्या  लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तिकीटावर चांगल्या मतांनी निवडून येण्याची किमया डॉ. कोल्हे यांच्या नावावर आहे. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या ‘अँटीइक्मपन्सी ’आणि ‘‘स्वराज्यरक्षक संभाजी’’ मालिकेची मोठी लोकप्रियता याचा फायदा डॉ. कोल्हे यांना निवडणुकीत झाला.

राज्यात भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना या महायुतीचे सरकार स्थापन झाले. महाविकास आघाडी सरकारला पायउतार व्हावे लागले. त्यामुळे राज्यातून मिळणारी ताकद कमी झाली. डॉ. कोल्हे यांना केंद्रातील सत्ताधारी नेत्यांवर अवलंबून रहावे लागत आहे. मतदार संघातील समस्या सोडवण्यासाठी भेटीगाठी कराव्या लागत आहेत. त्यातच राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीतील अनेक दिग्गज नेते भाजपाच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. महाविकास आघाडीकडून शिरुर लोकसभा मतदार डॉ. कोल्हे यांना तिकीट निश्चित होईल. पण, राज्यात सत्ता नसल्यामुळे पुन्हा केंद्रात भाजपाशीच जुळवून घ्यावे लागेल. त्यातच माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिंदे गटात उडी मारल्यामुळे आगामी निवडणुकीत भाजपाकडून आढळराव-पाटील यांचे तिकीट निश्चित होईल. भाजपा+ बाळासाहेबांची शिवसेना अशी ताकद एक झाल्यास डॉ. कोल्हे यांना मोठी कसरत करावी लागणार आहे. कारण, माहायुतीचा उमेदवार ‘कमळ’ चिन्हावर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. परिणामी, संभाव्य धोका ओळखून डॉ. कोल्हे यांनी भाजपाशी सलोखा वाढवला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे मंथन शिबिरासह पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील अनेक कार्यक्रमांना त्यांनी अनुपस्थिती दिसते, असे राजकीय जाणकारांचे निरीक्षण आहे.

भाजपाने शिरुर लोकसभा मतदार संघावर गेल्या दीड-दोन वर्षांपासून ‘फोकस’ केला आहे. लोकसभा प्रभास योजनेत शिरुर मतदार संघाचा समावेश केला असून, २०२४ च्या निवडणुकीच्या दृष्टीने मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. मध्यंतरी केंद्रीय आदिवासी कल्याण मंत्री रेणुका सिंह यांनी दौरा केला. या मतदार संघाच्या निवडणूक प्रभारी आमदार माधुरी मिसाळ आहेत. त्यांनी मतदार संघामध्ये बैठकांचा सपाटाला लावला आहे. भाजपाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्यावरसुद्धा पक्षाने मतदार संघातील जबाबदारी दिली आहे. पिंपरी-चिंचवडमधील भोसरी, शेजारील खेड, मंचर आणि जुन्नर, आंबेगाव आदी मतदार संघात लांडगे यांचा प्रभाव आहे. त्यामुळे माजी खासदार शिवाजीराव आढळराव किंवा आमदार महेश लांडगे यांच्यापैकी एकाला भाजपाची अधिकृत उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. मात्र, डॉ. कोल्हे यांनी केंद्रीय नेत्यांशी तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सलोखा ठेवल्यामुळे माजी खासदार आढळरावांचे शिंदे गटातून राज्यपाल किंवा राज्यसभेवर पुनर्वसन करण्यात येईल. तसेच, फडणवीस यांचे विश्वासू म्हणून ओळखले जाणारे आमदार लांडगे यांना राज्याच्या मंत्रीमंडळात संधी देऊन डॉ. कोल्हे यांचा भाजपा प्रवेशाचा मार्ग मोकळा केला जाईल, असे अंदाज वर्तवण्यात येत आहे.

‘‘व्हाय आय किल्ड गांधी’’ मधील नथूराम गोडसे यांची भूमिका, केंद्रीय मंत्री अमित शाह, नितीन गडकरी आणि फडणीस यांच्याशी असलेली जवळीक आणि राष्ट्रवादीच्या निर्णायक कार्यक्रमांत असलेली अनुपस्थिती यासह डॉ. कोल्हे यांच्या भाजपाविरोधातील आक्रमतेची कमी झालेली ‘‘धार’’ पाहता डॉ. कोल्हे आगामी निवडणूक ‘‘कमळ’’ च्या मदतीने लढण्याची मानसिकता करतील, असे चित्र आहे. विशेष म्हणजे, ‘‘शिवप्रताप गरुडझेप’’ चित्रपटाच्या निमित्ताने डॉ. कोल्हे यांनी अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता गुजरात विधानसभा निवडणुकीत प्रचंड लोकप्रियता असलेल्या डॉ. कोल्हे यांना ‘‘स्टार प्रचारक’’ यादीत स्थान दिसत नाही. त्यामुळे डॉ. कोल्हे यांच्या गेल्या काही महिन्यांतील हालचाली आणि भेटीगाठ वेगळी राजकीय दिशा दर्शवतात, असेही निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.