केजे शिक्षण संस्थेत ‘स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव’ उत्साहात साजरा

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत येवलेवाडी येथील केजे शिक्षण संस्थेत ‘स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव’ उत्साहात साजरा करण्यात आला. एकूण २०० विद्यार्थ्यांनी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने मानवी साखळी करत ‘७५ वा स्वातंत्र्यदिन’ व ‘इंडिया’ आकार साकारला.प्रत्येकाच्या हातामध्ये तिरंगा व साकारण्यात आलेले ही अक्षरे हे नयनम्य दृश्य पाहण्याजोगे होते. यासह ‘हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत शिक्षक व विद्यार्थ्यांना जागृतीपर मार्गदर्शन, तसेच संस्थेच्या प्रत्येक महाविद्यालयामध्ये तिरंगा ध्वजाचे वितरण करण्यात आले.

यावेळी केजे शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण जाधव, कार्यकारी संचालक मेजर जनरल (निवृत्त) समीर कल्ला, ट्रिनिटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. अभिजित औटी, केजे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास खोत, ट्रिनिटी अकॅडमीचे प्राचार्य डॉ. निलेश उके, डॉ. संजय चौधरी, डॉ. श्रीकांत जोशी, डॉ. प्रीती शर्मा, प्रा. बी. एस. केशव, डॉ. रुपाली ढमढेरे यांच्यासह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कल्याण जाधव म्हणाले, देशाच्या उज्वल भविष्यासाठी व विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. शाळेतील लहान मुलांच्या मनामध्ये राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करणे गरजेचे आहे. त्यासाठी संस्थेमध्ये याविषयी सातत्याने उपक्रम राबवले जातात. विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञानामध्ये विकास व संशोधन करून देशाचे नाव जागतिक स्तरावर नेण्यासाठी वाटचाल करावी.तिरंगा हा आपला अभिमान असून, त्याची शान राखणे प्रत्येकाची जबाबदारी आहे. तिरंग्याचा सन्मान राखण्याची काळजी घ्यावी. त्याचे नियम समजून घ्यावेत, असे समीर कल्ला यांनी सांगितले.

डॉ. अभिजित औटी उपक्रमाचे संयोजन केले. अशा उपक्रमातून आपली राष्ट्रीय एकात्मता पाहायला मिळते, असे ते म्हणाले. महाविद्यालयाचा विद्यार्थी शिवराज शिंदे याने स्वनिर्मित ड्रोनच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे सुदंर चित्रीकरण केले. प्रत्येकाने घरी ध्वज फडकवण्याच्या सूचना प्रा. महेंद्र हंडोरे व प्रा. गजानन अरसलवाड यांनी दिल्या. प्रशांत रेणुशे व सिद्धार्थ खंडागळे यांनी परिश्रम घेतले.