औरंगजेबाचे उदात्तीकरण होऊच शकत नाही, मुस्लिम कुटुंबांनी आपल्या लहान मुलांना इतिहास समजून सांगावा – मुश्रीफ 

Hasan Mushrif:  कोल्हापूरमधील तणाव निवळला असतानाच कागलमध्येही आक्षेपार्ह पोस्ट आढळून तणाव निर्माण झाला आहे. मात्र, पोलिसांनी वेळीच बंदोबस्त करत पोस्ट करणाऱ्याला बेड्या ठोकल्या आहेत. त्याचबरोबर कागलमधील चौकाचौकांमध्ये कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर माजी कामगार मंत्री कागलचे आमदार हसन मुश्रीफ यांनी भाष्य केले आहे.

ते म्हणाले, गेला आठवडा झाला कोल्हापूरातील वातावरण बिघडलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांना कधी मुस्लिमांबद्दल आकस नव्हता. तसेच मुस्लिम समाजालाही त्यांच्याबद्दल कधीच आकस राहिलेला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पाहिला तर जीवाची बाजी लावून महाराजांची आग्र्याहून सुटका करणारे मदारी मेहतर असो किंवा अन्य २२ वतनदार असो वा सैन्याचे प्रमुख असो या सर्व विश्वासूंशिवाय महाराज स्वराज्याची लढाई लढू शकले नसते. इतके सैन्य प्रमुख व मावळ्यांसोबत शिवाजी महाराजांची औरंगजेबाच्या सैन्याशी लढाई केली. त्यामुळे औरंगजेब आपला होऊच शकत नाही, असे स्पष्ट मत माजी मंत्री आ. हसन मुश्रीफ यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.

मुस्लिम धर्मीयांनी आपल्या मुलांकडे लक्ष देण्याची गरज असून हा इतिहास समजून सांगण्याची आवश्यकता आहे, असे मत हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले. धर्म हा आपापल्या घरी ठेवून सामाजिक वातावरण शांत राखण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. टिपू सुलतान याचे स्टेटस ठेवले म्हणून पुन्हा वातावरण बिघडले होते. त्या तरुणास अटक केली. अशा घडणाऱ्या घटनांसाठी पोलिसांनी तात्काळ कारवाई करण्याची आवश्यकता आहे. पोलिसांनी अशा घटनांच्या बाबतीत सतर्क राहणे आवश्यक आहे. निवडणुका जशा जवळ येत आहेत तसतसे वातावरण बिघडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असा आरोप हसन मुश्रीफ यांनी केला. हिंदू-मुस्लिम समाजाने एकमेकांमध्ये सलोखा राहून शांतता राखण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन मुश्रीफ यांनी केले.