दिल्लीत भाजपा पक्षश्रेष्ठी करणार मंत्रिमंडळावर शिक्कामोर्तब ?

मुंबई : शिंदे सरकारनं विश्वासदर्शक ठराव 164 विरुद्ध 99 अशा फरकाने जिंकल्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीपदी (Deputy CM Devendra Fadnavis) विराजमान झाले आहेत. दरम्यान, आता सर्वांचे लक्ष मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागले आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी तर शपथ घेतली, पण  11 जुलैला या संबंधित महत्त्वाची सुनावणी होणार आहे. त्यानंतरच खातेवाटप, मंत्रिमंडळ विस्तार त्यानंतरच होईल हे म्हणूनच सांगितलं जातंय.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)हे मंत्रिमंडळ खातेवाटपापूर्वी उद्यापासून दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. या भेटीत ते पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा (Amit Shah), भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेणार आहेत. या भेटीदरम्यान राज्यातील मंत्रिमंडळाचे खातेवाटप नक्की होईल असे सांगण्यात येते आहे.

गृह खात्यासह महत्वाची खाती भाजपकडे

गृह विभाग, अर्थ विभाग, सार्वजनिक बांधकाम, गृहनिर्माण, जलसंपदा, ऊर्जा, उच्च आणि तंत्रशिक्षण, पाणीपुरवठा आणि स्वच्छता, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास, पर्यटन, अन्न व नागरी पुरवठा, कौशल्य विकास, ओबीसी विकास, ग्रामविकास ही खाती भाजपकडे असतील.

शिंदे गटाकडे 13 ते 14 मंत्रिपद

एकनाथ शिंदे गटाकडे 13 ते 14 मंत्रिपद असतील.  यात नगरविकास, उद्योग, कृषी, खाणकाम, वाहतूक, पर्यावरण, रोजगार हमी, फलोत्पादन, शालेय शिक्षण, मृद व जलसंधारण आदी खाती मिळण्याची शक्यता आहे.महसूल आणि आरोग्य विभाग कोणाकडे असेल याबद्दल अद्यापही चर्चा सुरू आहे.