पंतप्रधान मोदींच्या हस्ते संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा संपन्न

देहू – पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi ) यांच्या हस्ते श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी मोठ्या संख्येनं वारकरी उपस्थित होते. यावेळी वारकऱ्यांनी संत तुकराम महाराजांचा नामघोष केला. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

जगदगुरु संत तुकाराम महाराजांची गाथा इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवल्यानंतर अभंग गाथा इंद्रायणीच्या पाण्यातून तरली आणि वर आली. तोपर्यंत तुकाराम महाराजांनी 13 दिवस अन्नपाणी ग्रहण केलं नाही. तुकाराम महाराज 13 दिवस ज्या शिळेवर  उपोषणाला बसले होते, तीच शिळा भाविकांच्या दर्शनासाठी तपोवन महाराजांनी देहू मंदिरात आणून ठेवली होती. त्या शिळेवर भव्यदिव्य मंदिर असावं असा वारकरी संप्रदायाचा आग्रह होता. म्हणून देहूतील मुख्य मंदिरात ही स्थापीत केली असून मंदिरास शिळा मंदिर असे संबोधले जात आहे.

यावेळी बोलताना मोदी म्हणाले,  देहूचे शिळा मंदिर हे केवळ भक्तीचे केंद्रच नाही तर भारताच्या सांस्कृतिक भविष्याचा मार्गही प्रशस्त करते. या पवित्र स्थानाची पुनर्बांधणी केल्याबद्दल मी मंदिर ट्रस्ट आणि सर्व भक्तांचे आभार मानतो. जगातील सर्वात जुन्या जिवंत संस्कृतींपैकी भारत एक असल्याचा आम्हाला अभिमान आहे. याचे श्रेय जर कोणाला जात असेल तर ते भारताच्या संत परंपरेला, भारतातील ऋषीमुनींना आहे. भारत शाश्वत आहे, कारण भारत ही संतांची भूमी आहे. असं ते म्हणाले.