Pune : जिल्ह्यात साडेतीन लाख  मतदारांची मतदार यादीतील तपशीलाशी आधार जोडणी पुर्ण

पुणे  : भारत निवडणुक आयोगाच्या शिफारशीनुसार मतदार यादीतील तपशीलाशी जोडण्याकरीता व प्रमाणीकरणासाठी मतदारांची ऐच्छिकपणे आधारची माहीती संग्रहित करण्याबाबतच्या सुधारणा करण्यात आल्या असून जिल्ह्यात आतापर्यंत ४ लाख  मतदारांची मतदार यादीतील तपशीलाशी आधार जोडणी पुर्ण झाली आहे.

पुणे जिल्ह्यात २१ विधानसभा मतदार संघामध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यामार्फत तसेच, ऑनलाईन पद्धतीने १ ऑगस्ट २०२२ पासून सदर आधार जोडणीचे कामकाज सुरु आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत एकुण ७८ लाख ६९ हजार २७६ इतके मतदार आहेत. त्यापैकी आज अखेर ३ लाख ८२ हजार ३५१ मतदारांची आधार जोडणी करण्यात आलेली आहे. यामध्ये प्रामुख्याने इंदापूर, आंबेगाव, भोर, खेड, मावळ या ग्रामीण भागातील विधानसभा मतदार संघातील मतदारांनी शहरी मतदार संघातील मतदारापेक्षा चांगला प्रतिसाद दिला आहे.

मतदार यादीतील विद्यमान मतदारांना त्यांचा आधार क्रमांक मतदार यादीच्या तपशीलाशी जोडण्यासाठी अर्ज क्र. ६ब भारत निवडणुक आयोगाच्या  www.nvsp.in या संकेतस्थळ, वोटर पोर्टल किंवा वोटर हेल्पलाईन ॲपद्वारे सुविधा उपलब्ध करून देण्यता आली आहे. मतदारांना आपल्या मोबाईलमध्ये ॲप स्थापित करुन आधार जोडणी करता येईल.

याबाबत ११ सप्टे २०२२ रोजी पुणे जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रावर आधार जोडणीबाबतत विशेष शिबीर आयोजित करण्यात येणार असून  जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघातील मतदारांनी आपला आधार क्रमांक मतदार यादीच्या तपशीलाशी जोडण्यासाठी उत्स्फुर्तपणे सहभाग द्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.