‘मी हे असले व्रत, उपवास करायला वेडी नाही,भारताची सौदी अरेबियाकडे वाटचाल सुरु’

Mumbai – बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते नसीरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) यांची पत्नी आणि अभिनेत्री रत्ना पाठक शाह(Ratna Pathak Shah)  यांनी हिंदू सणाबाबत असे वक्तव्य केल्याने वादाला तोंड फुटले आहे. करवा चौथचा सण साजरा करणाऱ्या महिलांची या अभिनेत्रीने अंधश्रद्धा आणि पुराणमतवाद म्हणत खिल्ली उडवली आहे. रत्ना पाठक यांच्या या विधानाला विरोध करत सोशल मीडियावर अनेकजण त्यांच्याविरोधात आवाज उठवत आहेत.

रत्ना पाठक शाह यांनी पिंकव्हिलाशी (Pinkvilla) बोलताना सांगितले की, तिला गेल्या वर्षी कोणीतरी विचारले होते की ती तिच्या पतीच्या आरोग्यासाठी करवा चौथचा उपवास करते का? यावर त्या म्हणाल्या, मी वेडी आहे का, हे कोण करेल? मी हे असले व्रत, उपवास करायला वेडी नाही. आजच्या काळात सुशिक्षित महिलादेखील पतीच्या दिर्घायुष्यासाठी असले व्रत करतात ही खूप आश्चर्याची गोष्ट आहे. पतीच्या दिर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. खरं तर भारतात एका विधवेला भयाण आयुष्य जगावं लागतं आणि याच भितीपोटी महिला हे असले व्रत करतात. २१ व्या शतकात आपण असल्या गोष्टी करतो हे खरचं दुर्दैव आहे. एकविसाव्या शतकातही आपण असेच बोलत आहोत का? आश्चर्याची बाब म्हणजे सुशिक्षित महिलाही तेच करत आहेत.

आपल्या देशातील महिलांमध्ये काहीही बदल झालेला नाही. त्या उलट आपला देश हा परंपरावादी होत आहे. भारताची सौदी अरेबियाकडे वाटचाल सुरु आहे का? असा सवाल रत्ना पाठक यांनी विचारला आहे.सध्या आपला देश हा परंपरावादी होण्याच्या मार्गावर चालला आहे. आपला देश आजही जुन्या चालीरिती, परंपरा, प्रथा पाळत आहे असे त्यांनी यावेळी म्हटले.