कॅफे शॉपसाठी नवीन नियमावली लागू, आदेशाचे पालन न करणारी व्यक्ती शिक्षेस पात्र

नियमावलीनुसार शॉपमध्ये बदल करण्यास 9 जुलैपर्यंत मुदत

लातूर  : कॅफे शॉपमध्ये (Cafe Shops) (कॉफी कॅफे, हॉटेल) गैरकृत्ये होवू नयेत, यासाठी जिल्ह्यात नवीन नियमावली लागू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व कॅफे शॉपमध्ये (कॉफी कॅफे, हॉटेल) या नियमावलीची अंमलबजावणी करणे बंधनकारक असल्याचे जिल्हादंडाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी सर्व कॅफे शॉप चालकांसाठी निर्गमित केलेल्या आदेशात म्हटले आहे. या आदेशाचे पालन न करणारी व्यक्ती भारतीय दंड संहिता 1860 मधील कलम 188 नुसार विहीत केलेल्या शिक्षेस पात्र राहील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या नवीन नियमावलीनुसार कॅफे शॉपमधील पूर्ण बैठक व्यवस्था सीसीटीव्ही. कॅमेऱ्याच्या कक्षेत येईल, अशा स्वरुपात सीसीटीव्ही यंत्रणा कॅफे शॉपमध्ये (कॉफी कॅफे/हॉटेल) बसविणे बंधनकारक आहे. तसेच सर्व दरवाजे पारदर्शक काचेचे असावेत. दोन्ही बाजूस बसलेले लोक एकमेकांच्या सहज दृष्टीस पडतील, अशी बैठक व्यवस्था करावी. बैठक व्यवस्थेच्या सर्व ठिकाणी स्पष्ट दिसेल अशी प्रकाश योजना असावी. कॅफे शॉपमध्ये अंतर्गत बंदीस्त कॅम्पार्टमेंट करण्यात येवू नयेत. डेक, डॉल्बी किंवा इतर ध्वनीक्षेपण व्यवस्था ध्वनीप्रदुषण नियमांचे उल्लंघन करणारी नसावी. कॅफेमध्ये धुम्रपान करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. शासनाने ठरवून दिलेल्या वेळेतच कॅफे शॉप (कॉफी कॅफे/हॉटेल) सुरु राहतील, याची काळजी घ्यावी, असे नियमावलीत म्हटले आहे.

कॅफे शॉपबाबतची नवीन नियमावली 20 जून 2023 पासून लागू करण्यात आली असून पुढील काळात कॅफे शॉपमध्ये (कॉफी कॅफे/हॉटेल) नियमावलीचे पालन करणे बंधनकारक आहे. त्यासाठी आवश्यक बाबींची पूर्तता करण्यासाठी 9 जुलै 2023 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. यापुढे नव्याने सुरु होणाऱ्या कॅफे शॉपमध्ये स्थापनेच्या दिवसापासूनच या नियमावलीचे पालन करणे बंधनकारक राहील, असे जिल्हादंडाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी निर्गमित केलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.