पहिल्या वनडेत न्यूझीलंडने भारताचा उडवला धुव्वा; लॅथम, विलियम्सन विजयाचे शिल्पकार

ऑकलँड: भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात ईडन पार्क येथे झालेला पहिला वनडे सामना यजमानांनी जिंकला. भारताने प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडला ३०७ धावांचे भलेमोठे लक्ष्य दिले. या लक्ष्याचा पाठलाग करताना सुरुवातीला न्यूझीलंडच्या फलंदाजीला गळती लागली. मात्र पुढे कर्णधार केन विलियम्सन आणि टॉम लॅथम यांनी झुंजार खेळी खेळत संघाला दमदार पुनरागमन करून दिले. न्यूझीलंडने ७ विकेट्स राखून सामना जिंकला आणि वनडे मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

भारताच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ एकवेळ ३ बाद ८८ धावा अशा स्थितीत होता. फिन ऍलन, डेवॉन कॉन्वे या सलामी जोडीसह त्यांनी डॅरिल मिचेलची महत्त्वपूर्ण विकेट गमावली होती. मात्र पुढे कर्णधार विलियम्सन आणि लॅथन यांनी संयमी आणि चतुर खेळी केल्या. यष्टीरक्षक लॅथमने १०४ चेंडूत ५ षटकार आणि १९ चौकारांच्या मदतीने १४६ धावा फटकावत संघाचा विजय निश्चित केला.

दुसऱ्या बाजूने विलियम्सननेही प्रभावी प्रदर्शन केले, मात्र तो शतकाला मुकला. १ षटकार आणि ७ चौकार मारत तो ९४ धावांवर नाबाद राहिला. न्यूझीलंडने ४७.१ षटकातच ७ विकेट्सने सामना खिशात घातला. या डावात पदार्पणवीर उमरान मलिकने २ विकेट्स घेत प्रभावित केले.

तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाकडून श्रेयस अय्यरने शानदार खेळी केली होती. त्याने भारताकडून सर्वाधिक ८० धावा चोपल्या. या खेळीसाठी त्याने प्रत्येकी ४ चौकार व षटकार मारले. तसेच कर्णधार शिखर धवन (७२ धावा) आणि शुबमन गिल (५० धावा) यांनीही अर्धशतके ठोकली. मात्र त्यांच्या खेळी व्यर्थ ठरल्या.

आता उभय संघातील दुसरा सामना सेडन पार्क येथे २७ नोव्हेंबरला रंगणार आहे.