याही वेळेस पंकजा मुंडेंना पक्षाकडून पद्धतशीरपणे डावलले जाणार ?

बीड : राज्यसभेच्या पाठोपाठ महाराष्ट्रातील विधान परिषदेच्याही निवडणुका होणार आहे. एकूण 10 जागांसाठी निवडणूक होणार असून विधान परीषदेच्या आमदारांचा कार्यकाळ संपला आहे. यामध्ये रामराजे निंबाळकर, सुभाष देसाई, प्रविण दरेकर,प्रसाद लाड आणि सदाभाऊ खोत यांचा समावेश आहे. भाजपकडून प्रवीण दरेकर,सदाभाऊ खोत,प्रसाद लाड,विनायक मेटे यांना उमेदवारी दिली होती. या विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारीसाठी माजी मंत्री व भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे ( Pankja Munde )  यांचे नाव आघाडीवर असल्याच्या वावड्या सोशल मिडियावर उठवण्याच्या प्रयत्न नेहमीप्रमाणेच सुरू असल्याचे चित्र सध्या पाहण्यास मिळत आहे.

2019 मध्ये विधानसभा निवडणूकीत बंधू धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याकडून पराभूत झाल्यानंतर राज्यातील राजकारणात पंकजा मुंडे फारच कमी सक्रिय झालेल्या आहेत. भाजपकडून (Bjp) राष्ट्रीय सचिव पद मिळाल्यानंतर पंकजा मुंडे या देशपातळीय राजकारणात सक्रिय झालेल्या पाहण्यास मिळत आहेत. मात्र,विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पंकजा मुंडे यांना पक्षातून अनेकदा डावलून अंतर्गत कुरघोडी झाल्याची चर्चा मुंडे समर्थकांमध्ये सुरू आहे.नेहमीच पंकजा मुंडे यांच्या समर्थकांमध्ये उत्सुकता वाढवली जाते ते देखील नेहमी प्रमाणे याला बळी पडतात आणि शेवटी भ्रमनिरास होऊन पक्ष श्रेष्ठीवर पातळी सोडून टीका केल्याचे चित्र अनेकदा सोशल मीडियावर पाहण्यास मिळाले आहे.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) आणि पंकजा मुंडे यांच्यातील शीतयुद्ध सर्वश्रुत आहे. 2019 मध्ये ‘मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री’ असं ‘तथाकथित’ पंकजा मुंडे यांनी न केलेलं वक्तव्य त्यांना चांगलंच महागात पडलं होते. डॉ.कराड यांची राज्यसभेवर वर्णी लागली तेव्हा त्यांना डावलण्यात आले. पुढे मंत्रीपदासाठी त्यांच्या भगिनी खा.प्रितम मुंडेंना डावलण्यात आले.त्यावेळी पंकजा मुंडेंची नाराजी स्पष्टी दिसून आली होती पण त्यांनी ती कधीच जाहीर केली नाही तर ती त्याच्या समर्थकांच्या माध्यमातून बाहेर आली.

आता काही दिवसांपुर्वीच औरंगाबादच्या जल आक्रोश मोर्चाची जबाबदारी केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भागवत कराड,रावसाहेब दानवे आणि संजय केणेकरांनी घेतली होती. फडणवीसांना दुखावू नये, यासाठी पंकजा मुंडेंना या मोर्चाचं साधं निमंत्रणही देण्यात आले नाही. तसेच,मुंबईतील ओबीसी मोर्चा मध्ये देखील पंकजा मुंडे यांना निमंत्रण न देता त्यांना थेट उघडपणे डावलण्यात आले. त्यामुळे,पंकजा मुंडे यांच्या विरोधात अद्यापही पक्षांतर्गत सुप्तसंघर्ष चालू असल्याचे पाहण्यास मिळत आहे.

त्यामुळेच, पंकजा मुंडेंना विधानपरिषदेची उमेदवारी देण्याच्या वावड्या उठवण्याचा मोठे प्रयत्न सध्या सुरू आहेत. आजवरच्या अनुभवानुसार मीडियावर चर्चा घडवून ऐन वेळेला डावलण्यात येणार असल्याचे तर्क-वितर्क अनेकांकडून राजकीय वर्तुळात व्यक्त केले जात आहेत.’मी विधान परिषदेत जावं,अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे’,अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना दिली असल्याची नवीन वावडी सोशल मीडियावर झळकताना दिसत आहे.

यामुळे, एकंदरित नेता तसेच कार्यकर्ता या दोघांना देखील ‘संयम’ ठेवण्याशिवाय गत्यंतर नाही. काळ सबुरीचा नक्कीच आहे. परंतु,संपर्क वाढीच्या आणि मेहनतीच्या जीवावर पंकजा मुंडे सर्व गोष्टींवर मात करून भविष्यातील राजकारण आपल्या बाजूने नक्कीच करू शकतात.त्यामुळे,या निवडणुकीत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना पक्षाकडून संधी मिळते का? की आजवरच्या अनुभवानुसार याही वेळेस पंकजा मुंडेंना पक्षाकडून पद्धतशीरपणे डावलले जातेय? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.