“11 महिने गरोदर असलेला पुरुष दिसतो हा भास्कर, पिसाळलेल्या कुत्र्यासारखा..”, निलेश राणेंचे टीकास्त्र

ठाणे- शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना फडतूस संबोधल्याने बराच गदारोळ झाला. यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही ठाकरेंना प्रत्युत्तर देत फडणवीसांना पुन्हा पातळी सोडून अशी टीका केल्यास मातोश्री बाहेर पडू देणार नाही, असा इशारा दिला होता. आता बावनकुळेंच्या या वक्तव्याच्या समाचार घेताना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी चंद्रशेखर बावनकुळेंना रंगावरुन सुनावले.

ठाण्यात बोलताना भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) म्हणाले होते, “चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) हे महाराष्ट्राचे आहेत, पण दिसतात वेस्ट इंडिजच्या खेळाडूसारखे. बावनकुळे पॅट्रिक पॅटरनसारखे दिसतात का तर नाही. ब्रायन लारासारखे दिसतात का तर नाही. मग, ते कोणासारखे दिसतात, तर वेस्ट इंडिजचे खेळाडू अ‍ॅब्रोससारखे दिसतात. जुन्या लोकांना माहिती आहे, कर्ली अ‍ॅब्रोस कसे दिसत होते.”

“तुम्ही वेस्ट इंडिजच्या खेळाडूसारखे दिसता. पण, ते खेळाडू होते, तुम्ही कोणाबरोबर खेळताय, उद्धव ठाकरेंबरोबर. उद्धव ठाकरे तुम्हाला एका चेंडूत आऊट करतील, पत्ता सुद्धा लागणार नाही,” असे भास्कर जाधव यांनी म्हटले होते.

भास्कर जाधवांच्या या वक्तव्यावर भाजपा नेत्यांकडून जोरदार टीका होत आहे. अशातच निलेश राणे (Nilesh Rane) यांनीही भास्कर जाधवांवर टीकास्त्र सोडले आहे. ‘ठाकरे गटाचा आमदार भास्कर जाधव हा पिसाळलेल्या कुत्र्यासारखा कोणावरीही भुंकत असतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष असताना पवार साहेबांनी याला सर्वात कमी काळ अध्यक्ष ठेवला कारण हा भलतंच काहीतरी बोलत बसायचा. चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर खालच्या पातळीची टीका याने केली, कोण कसा दिसतो हे सोडून दे भास्कर जाधव तू स्वतःला सलमान खान समजतो काय, 11 महिने गरोदर असलेला पुरुष दिसतो हा भास्कर.’ अशा शब्दांत निलेश राणेंनी भास्कर जाधवांचा समाचार घेतला आहे.