आता तांडव होणार, किती गुन्हे दाखल करायचे ते करा; नितेश राणेंचा शिवसेनेला इशारा

मुंबई – राज्यात कायदा सुव्यस्था आहे की नाही असा सवाल उपस्थित करण्याची वेळ आली आहे. कारण विरोधी पक्षातील नेत्यांवर सत्ताधारी मंडळींकडून हल्ले करण्यात येत असल्याचे वारंवार समोर येत आहे. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा (MP Navneet Rana and MLA Ravi Rana) यांना पोलिसांनी काल अटक केली आहे. दरम्यान, त्यांना भेटायला आलेले भाजपा नेते किरीट सोमय्या (BJP leader Kirit Somaiya) यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केला. खार पोलीस ठाण्यातून बाहेर पडताच हा हल्ला झाला आहे. ( Shiv Sena Attack Somaiya Car ) दरम्यान या प्रकरणी सोमय्या यांनी बांद्रा पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

खार पोलिसांकडून (Khar police) अटक करण्यात आलेल्या राणा दांपत्याला भाजपा नेते किरीट सोमय्या भेटायला आले असता शिवसैनिकांनी पोलीस ठाण्याबाहेर जोरदार घोषणाबाजी केली. सोमय्या हे पोलीस ठाण्याबाहेर पडताच शिवसैनिकांनी त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. गाडीवर चपलांचा मारा केला. तसेच, दगडही गाडीवर मारण्यात आले. त्यात सोमय्या यांच्या गाडीची काच फुटली असून सोमय्या यात जखमी झाले आहेत.

दरम्यान, किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर भाजप आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांनी सत्ताधारी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे. आम्हाला राज्यात कायदा आणि सुव्यवस्था खराब करायची नाही. ज्या पक्षाचे मुख्यमंत्री आहेत, त्याच पक्षाचे कार्यकर्ते मस्ती करत आहेत. त्यांचेच नातवाईक असा धिंगाणा घालत असतील तर राज्यातील जनतेने कायदा सुव्यवस्थेबाबत कोणाकडून अपेक्षा ठेवावी असे म्हणत राणे यांनी शिवसेनेवर टीका केली. किरीट सोमय्या हे भ्रष्टाचाराविरोधात लढत आहेत. त्यांच्यावर हल्ला झाला आहे. हा नामर्दणपणाचा प्रकार सुरु असल्याचे नितेश राणे म्हणाले. तुम्ही हल्ले करताना आम्ही शांत बसणार नाही असेही राणे म्हणाले. आता तांडव होणार, किती गुन्हे दाखल करायचे ते करा असा इशाराही राणे यांनी दिला.