विधानसभा अध्यक्षपदी कोण ? कॉंग्रेसच्या उमेदवाराचे नाव गुलदस्त्यात

मुंबई – राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून मुंबईत सुरू होत आहे.अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला काल मंत्रीमंडळ सदस्यांसमवेत संध्याकाळी चहापानाचा कार्यक्रम पार पडला. तत्पूर्वी सह्याद्री अतिथीगृहात मंत्रीमंडळातील मंत्र्यांची बैठक झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. दरम्यान, उद्धव ठाकरे  हे आजारपणामुळे विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला हजेरी लावणार की नाही, यावर बरीच चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

यावेळचं अधिवेशन विविध मुद्द्यांनी गाजणार हे नक्की आहे. ओबीसी आरक्षण, पेपरफुटी, परीक्षेतला विलंब, मराठा आरक्षण, शेतकरी प्रश्न अशा विविध मुद्द्यांवर या अधिवेशनात जोरदार गदारोळ होण्याची शक्यता आहे. आघाडी सरकारच्या कारभारावरून आणि नेत्यांवरच्या आरोपांवरून विरोधक सरकारला कोंडीत पकडण्याची चिन्हं आहेत. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूकही या अधिवेशनात होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, त्यांनी राजीनामा देत पक्षाचं प्रदेशाध्यक्षपद स्वीकारल्यानं हे पद रिक्त आहे. गेल्या अधिवेशनाचं कामकाज उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी पाहिलं. तर, काँग्रेस देखील या अधिवेशनात विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी आक्रमक झाली आहे. विधानसभा अध्यक्षपदी कोण उमेदवार असेल हे मात्र, काँग्रेसनं स्पष्ट केलेलं नाही.  त्यामुळे अध्यक्षपदी नेमकी कुणाची वर्णी लागणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.