मुंबई : लखीमपूर हिंसाचार प्रकरणावरुन महाविकास आघाडी सरकारनं आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळत आहे. या हिंसाचाराच्या निषेधात 11 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिलीय. हा बंद महाविकास आघाडी सरकारकडून म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेनं पुकारण्यात आल्याचं जयंत पाटील यांनी काल सांगितलं होतं. तसंच अन्य मित्र पक्षांशीही बोलणं सुरु असल्याचं पाटील यांनी सांगितलं.
त्यांनतर आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ‘येत्या 11 ऑक्टोबर रोजी होणारा महाराष्ट्र बंद हा राजकीय नसून संवेदनशीलतेसाठी आहे. शेतकऱ्यांप्रती संवेदना दाखवणारा आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या पाठी आहोत हे दाखवून देण्यासाठी आहे. तसेच लखीमपूर खिरी येथे झालेल्या हिंसेचा धिक्कार करण्यासाठी हा बंद पुकारण्यात आला आहे, असं सांगतानाच या घटनेतील आरोपींना सरकार का वाचवत आहे? कुणासाठी वाचवत आहे.’ असा थेट सवाल करत संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीच्या या भूमिकेवर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सडकून टीका केली आहे. कॅबिनेट बैठकीत लखीमपूर हिंसाचाराबाबत खेद व्यक्त केला हे ठीक. पण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा आक्रोश त्यांच्या कानी पोहोचला नाही का? त्यांचे कैवारी ते झाले नाहीत. अद्याप मदतीचा निर्णय घेतला नाही, असा खोचक टोलाही फडणवीसांनी लगावला आहे.
तर, दसऱ्यापूर्वी शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही तर भाजप आंदोलन करेल. उत्तर प्रदेशात काय झालं हे तिथलं सरकार काम करेल. इथे शेतकरी मरत आहेत. त्यावर हे काही बोलत नाही, अशी टीकाही फडणवीसांनी केलीय.
हे ही पहा:
https://www.youtube.com/watch?v=5wWKfxFFi5c