खरिपातील पिकांनी मान टाकली, अनेक ठिकाणी जनावरांचा चारा, पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई  

राज्यात यंदा उशिराने दाखल झालेला मोसमी पाऊस जुलै अखेर सक्रिय झाला. त्यानंतर झालेल्या पावसाने जुलै अखेपर्यंतची सरासरी भरून निघाली. मात्र, ऑगस्टमध्ये पावसाने मोठी ओढ दिली. जवळ जवळ संपूर्ण महिनाच कोरडा जाण्याची स्थिती आहे. 25 जुलै ते 25 ऑगस्टपर्यंतच्या कालावधीत 300 महसूल मंडलांमध्ये सलग 21 दिवसांपासून पाऊस न पडल्यामुळे दुष्काळसदृश स्थिती आहे, अशी माहिती राज्याच्या कृषी विभागाने दिली आहे.

राज्यात खरिपातील पिकांनी मान टाकली असून, अनेक ठिकाणी ती होरपळून गेली आहेत. जनावरांचा चारा, पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई जाणवत आहे. जून अखेरपर्यंत पेरणी होऊन जुलैमध्ये पावसात खंड पडल्यास जुलै अखेपर्यंत दुबार पेरणी करता येते. पण यंदा पेरण्याच जुलैअखेरीस झाल्याने दुबार पेरणी शक्य नाही. 300 महसूल मंडलांत खरिपाचा हंगाम जवळपास वाया गेल्याची स्थिती आहे.

आता सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये चांगला पाऊस झाला तर तिथे रब्बी पिकं घेता येतील. मात्र खरिपातील पेरणीसाठी केलेला खर्च आणि मेहनत वाया गेला आहे, असं कृषी विभागाचे मुख्य सांख्यिक विनयकुमार आवटे यांनी म्हटलं आहे.