पुण्यात दोन दिवसीय ‘डेक्कन लिटरेचर फेस्टीव्हल’चे आयोजन; ६३ हून अधिक लेखक, कलाकार, गायक यांचा सहभाग

पुणे : ‘दकनी अदब फाऊंडेशन’ तर्फे पुण्यात २६, २७ नोव्हेंबर रोजी ‘डेक्कन लिटरेचर फेस्टीव्हल’चे आयोजन करण्यात आले आहे. साहित्य, कविता, नाट्य, चर्चा, संगीत अशा बहुरंगी, बहु आयामी कार्यक्रमांची रेलचेल या फेस्टीव्हलमध्ये आहे. फेस्टिव्हलचे हे तिसरे वर्ष आहे. संचालक जयराम कुलकर्णी, मनोज ठाकूर, रविन्द्रपाल तोमर यांनी ही माहिती पत्रकार परिषदेमध्ये दिली. पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे ही पत्रकार परिषद शुक्रवारी दुपारी झाली. ‘डेक्कन लिटरेचर फेस्टिव्हल च्या मार्गदर्शक मोनिका सिंह यावेळी उपस्थित होत्या.

पुणेकर रसिकांना भारतभरातील काव्य-संगीत-नाट्य-साहित्य विषयक दिग्गजांच्या आविष्कारांचा आनंद घेता यावा अशी दोन दिवसांच्या कार्यक्रमांची रचना करण्यात आली आहे.मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तिन्ही भाषात विविध कार्यक्रम होणार आहेत.

फेस्टीव्हल सर्वांसाठी खुला असला तरी प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी http://deccanlitfest.com// संकेत स्थळावर करावी लागणार आहे, अशी माहिती जयराम कुलकर्णी यांनी दिली. यापूर्वी गुलाम मुस्तफा खान, दीप्ती नवल, आरती अंकलीकर-टिकेकर, कुमार विश्वास, सचिन खेडेकर, विशाल भारद्वाज, सुबोध भावे, निझामी बंधू,अशा अनेक मान्यवरांनी या फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावली आहे. कोरोना साथीच्या काळात २०२१ मध्ये हा फेस्टिव्हल होवू शकला नव्हता.