आमची आघाडी ही काही नैसर्गिक आघाडी नाही, विधानपरिषद विरोधी पक्षनेतेपदावरून काँग्रेस नाराज

मुंबई – सत्तांतर झाल्यानंतर आता महाविकास आघाडीत देखील धुसफूस सुरु झाली आहे. शिवसेनेचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांची विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी (Vidhan Parishad Opposition Leader) निवड झाली. परंतु महाविकास आघाडीमधील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसन (Congress) यावर आक्षेप घेतला आहे.

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावर नाराजी व्यक्त केली. विधानपरिषद विरोधी पक्षनेतेपदाची निवड करताना महाविकास आघाडी म्हणून चर्चा होणं आवश्यक होतं. मात्र, तशी चर्चा करण्यात आली नाही. आम्हाला विचारात घेतलं गेलं नाही. निवड कुणाचीही होवो, पण चर्चा होणं गरजेचं होतं. त्यामुळे आमचा या निवडीला विरोध आहे, असं नाना पटोले म्हणाले आहेत.

दरम्यान, आमची ही काही नैसर्गिक आघाडी नाही. ही आघाडी विपरित परिस्थितीत महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी आमच्या नेत्या सोनिया गांधी यांनी त्यावेळी केली. आम्ही काही सत्तेत नव्हतो. विरोधी पक्षात बसण्याचा कौल आम्हाला जनतेनं दिला होता. त्याप्रमाणे विरोधी पक्षात बसण्याची आमची मानसिकता होती. आम्ही विपरीत परिस्थितीत आघाडी केली. कायमस्वरूपी असा शब्द आम्ही वापरला नाही. नैसर्गक आघाडी असं आम्ही म्हटलंच नाही, असं नाना पटोले म्हणाले आहेत.