नागरिकांचे आयुष्य वाढविण्यासाठी जिल्ह्यात पर्यावरणपूरक उद्योग आणण्याला आपले प्राधान्य आहे – वडेट्टीवार

चंद्रपूर : चंद्रपूर हा नैसर्गिक साधन संपत्तीने नटलेला जिल्हा आहे. या जिल्ह्यात कापूस, धान, वनउपज आदी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. भविष्यात प्रदुषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी तसेच नागरिकांचे आयुष्य वाढविण्यासाठी जिल्ह्यात पर्यावरणपूरक उद्योग आणण्याला आपले प्राधान्य आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती शक्य होईल, असे प्रतिपादन आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले.

स्थानिक एन.डी. हॉटेल येथे एमआयडीसी असोसिएशनद्वारे आयोजित ‘संवाद उद्योजकांशी’ या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर पालकमंत्री वडेट्टीवार यांच्यासह मुख्य मार्गदर्शक म्हणून खासदार शरद पवार, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, खासदार बाळू धानोरकर, आमदार सर्वश्री सुभाष धोटे, प्रतिभा धानोरकर, किशोर जोरगेवार, माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, सुबोध मोहिते, प्रवीण कुंटे पाटील, मनोहर चंद्रिकापूरे उपस्थित होते.

जिल्ह्यात कोळसा खाणी, सिमेंट उद्योग, औष्णिक विद्युत केंद्र यामुळे प्रदुषणाची समस्या वाढली आहे, असे सांगून पालकमंत्री वडेट्टीवार म्हणाले, उद्योगांच्या वाढीसाठी आपण नेहमीच समर्थन केले आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कापसाचे उत्पादन होत असल्यामुळे टेक्सटाईल पार्कची आवश्यकता आहे. तसेच देशात धानाची निर्यात करणा-या चंद्रपूर जिल्ह्यात धानाच्या बाय-प्रॉडक्ट्सपासून इथेनॉलची निर्मिती शक्य आहे. त्यामुळे कृषी, वनउपज यावर आधारीत पर्यावरणपूरक उद्योगांना भविष्यात प्राधान्य राहील. उद्योगांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आपण सदैव प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली. कामागारांमुळे जिल्ह्यात आतापर्यंत एकही उद्योग बंद पडला नाही. भविष्यात नवीन चंद्रपूरची संकल्पना अंमलात आणावी लागेल असेही पालकमंत्र्यांनी आवर्जुन सांगितले.

उद्योगांचे विकेंद्रीकरण आवश्यक – शरद पवार

‘संवाद उद्योजकांशी’ हा अतिशय स्तुत्य उपक्रम येथे आयोजित केल्याने स्थानिक स्तरावरच्या उद्योगासंबंधीत अडीअडचणींची माहिती मिळाली. उद्योग येणे महत्वाचे असले तरी त्याचे विकेंद्रीकरण होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन खासदार शरद पवार यांनी केले.

पुढे ते म्हणाले, चंद्रपूरमध्ये मोठ्या प्रमाणात उद्योग आहे. आजूबाजूच्या परिसरात उद्योगांचे विकेंद्रीकरण झाल्यास अडीअडचणी व समस्या कमी उद्भवतात. उद्योगांचे छोटे छोटे युनीट तयार केले तर त्याचा जास्त फायदा होतो. जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी धानाच्या बाय – प्रॉडक्टस पासून इथेनॉल निर्मिती प्रकल्पाची मांडलेली संकल्पना अतिशय चांगली आहे. भविष्यात कोणताही उद्योग हा पर्यावरणपूरक व प्रदुषणमुक्त असावा. तसेच उद्योगात वेगवेगळे प्रयोग करणे आवश्यक आहे. पालकमंत्र्यांच्या नेतृत्वात उद्योजकांच्या शिष्टमंडळांनी राज्य सरकारसोबत बैठक घ्यावी. जेणेकरून उद्योजकांच्या समस्या सोडविल्या जातील. विशेष म्हणजे येथील कामगारांची उत्पादकता जास्त असल्यामुळे त्याचा लाभ उद्योजकांना मिळतो. उद्योजकांसाठी चंद्रपूरात अतिशय पोषक वातावरण आहे. अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून उद्योजकांशी संवाद कायम असावा, असेही पवार म्हणाले.

यावेळी खासदार बाळू धानोरकर म्हणाले, जिल्ह्यातील उद्योगांना गती देण्याचे प्रयत्न करणार असून उद्योगांच्या समस्या जाणून घेण्यासाठी शरद पवार यांनी महत्वाचा वेळ दिला. जिल्ह्याच्या व पूर्व विदर्भाच्या विकासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

या उद्योजकांनी मांडल्या समस्या : जिल्ह्यात कापूस प्रक्रिया उद्योगासाठी एक हजार एकर जमीन मिळावी. नागपूर येथील कळमनाच्या धर्तीवर व्यापारी संकूल बनावे. ऑनलाईन व्यापाराच्या युगात छोटे उद्योगही चालावे, यासाठी योजना बनवावी, अशी मागणी उद्योजक रामकिशन सारडा यांनी केली. प्रदुषणाची समस्या लक्षात घेता सिंगापूरच्या धर्तीवर येथे बायोमेडीकल हॉस्पीटल उभे राहावे. तसेच हॉयरालॉजी व इमिनोलॉजी करीता संस्था उभारावी, असे डॉ. चेतन कुटेमाटे म्हणाले. धानावर आधारीत एखादा मेगा फूड प्रोजेक्ट उभारावा, अशी मागणी जीवन बोंतमवार यांनी केली. वाईल्ड लाईफ टुरिझमला चालना मिळावी. तसेच वन उपजांवर आधारीत प्रकल्प यावे. प्रदुषण नियंत्रणाबाबत कायद्यांची कडक अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी प्रवीण गोठी यांनी केली. व्यापा-यांना सवलती देणे आवश्यक असून व्हॅट अंतर्गत जुनी प्रकरणे बंद करावीत, असे हर्षवर्धन सिंगवी म्हणाले. तर संयुक्त टेक्सटाईल व ऑटोमोबाईल उद्योग जिल्ह्यात यावे, अशी मागणी मधूसुदन रुंगठा यांनी केली.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते चंद्रपूर औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता पंकज सपाटे, देशात बांबुद्वारे पहिला ‘क्यूआर’ कोड निर्माण करणा-या युवा उद्योजिका मिनाक्षी वाळके यांच्यासह जीएमआर पॉवर, आदित्य इंजिनियरिंग, डब्ल्यूसीएल, एसीसी, अंबुजा सिमेंट उद्योग प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला. बैठकीला मोठ्या प्रमाणात उद्योजक उपस्थित होते.