‘राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी आमचा पाठिंबा शिवसेनेला, मग उमेदवार संभाजीराजे असो वा अन्य कुणीही’

मुंबई : राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी राष्ट्रवादीचा पाठिंबा हा शिवसेनेला असेल, मग शिवसेनेचे उमेदवार संभाजीराजे असो वा अन्य कुणीही असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलं. शरद पवार काल माध्यमांशी संवाद साधत होते, त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं.

शरद पवार म्हणाले की, राष्ट्रवादीचा एक उमेदवार राज्यसभेसाठी निवडून येऊ शकतो. उरलेली शिल्लक मतं ही आम्ही शिवसेनेला देणार आहोत. दोन वर्षांपूर्वी झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत आम्ही शिवसेनेकडून राज्यसभेची दुसरी जागा मागितली होती. त्यावेळी शिवसेनेने आम्हाला सहकार्य केलं होतं अशी माहिती देखील त्यांनी दिली.

पुढे बोलताना ते म्हणाले, पुढच्या वेळी राष्ट्रवादीने आपल्याला सहकार्य करावं अशी मागणी त्यावेळी शिवसेनेने केली होती. त्यामुळेच यावेळी आम्ही शिवसेनेला मदत करण्याची भूमिका घेतली. आता शिवसेनेचा सहाव्या जागेसाठी उमेदवार हे संभाजीराजे असो वा अन्य कुणीही, राष्ट्रवादी त्यांना मदत करेल आणि तो उमेदवार निवडून येईल.”