‘शिवसेने’ला अजूनही घाबरतंय पाकिस्तान, मुंबईच्या स्टेडियमवर वर्ल्ड कप सामना खेळण्यास दिला नकार

भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबर 2023 मध्ये होणार्‍या वनडे विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक आज जाहीर झाले आहे. विश्वचषक सुरू होण्यास 100 दिवस शिल्लक आहेत आणि त्यानिमित्ताने मुंबईत एका शानदार कार्यक्रमात वेळापत्रक जाहीर केले गेले. दरम्यान, आयसीसीने काल शेवटच्या क्षणी उपांत्य फेरीचे ठिकाण बदलण्याचा निर्णय घेतला.

त्यानुसार उपांत्य फेरीचे सामने मुंबई आणि कोलकाता येथे होणार आहेत. नोव्हेंबर महिन्यात पावसाच्या शक्यतेमुळे चेन्नई आणि बंगळुरूमधील सेमीफायनलचे ठिकाण बदलण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) पुन्हा नापसंतीची घंटा वाजवली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने वर्ल्ड कप सेमीफायनल सामना मुंबईत खेळण्यास नकार दिला आहे.

स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने सुरक्षेच्या कारणास्तव मुंबईत वर्ल्ड कपचा सेमीफायनल सामना खेळण्यास नकार दिला आहे. याची माहिती पाकिस्तानने आयसीसीला दिली आहे. जर भारतीय संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला तर त्यांचा सामना मुंबईत होईल. उपांत्य फेरीत पाकिस्तान आणि भारत आमनेसामने आले तर कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर खेळवला जाईल. पाकिस्तानने उपांत्य फेरीसाठी कोलकात्याची निवड केली आहे.

1991 मध्ये शिवसेनेने वानखेडेवर खेळणाऱ्या पाकिस्तानचा निषेध केला आणि भारत-पाकिस्तान वनडेच्या दोन दिवस आधी वानखेडेची खेळपट्टी खोदली. यानंतर पाकिस्तानने दौरा रद्द केला. 1993 आणि 1994 मध्येही पाकिस्तानने सुरक्षेच्या कारणास्तव येथे खेळण्यास नकार दिला होता. 1999 मध्ये 25 समर्थकांनी नवी दिल्लीतील फिरोजशाह कोटला स्टेडियमची खेळपट्टी खोदली. त्यावेळी पाकिस्तान 12 वर्षानंतर भारतीय भूमीवर पहिली कसोटी मालिका खेळणार होता.