पाकिस्तानची संसद बरखास्त; पुन्हा निवडणूका होणार

कराची – पाकिस्तानचे राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी पंतप्रधान इम्रान खान ( Imran Khan ) यांच्या सल्ल्यानुसार नॅशनल असेंब्ली विसर्जित करण्यास मान्यता दिली आहे. नॅशनल असेंब्ली बरखास्त करण्याची अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. राष्ट्रपती कार्यालयाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, पाकिस्तानचे राष्ट्रपती आरिफ अल्वी ( Arif Alvi ) यांनी पंतप्रधान इम्रान खान यांनी संविधानाच्या कलम ५८(१) अंतर्गत नॅशनल असेंब्ली (संसद) विसर्जित करण्याची शिफारस स्वीकारली आहे.

माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री फारुख हबीब ( Farukh Habib ) म्हणाले की, संसद बरखास्त करण्यात आली आहे आणि आता पुढील 90 दिवसांत म्हणजे तीन महिन्यांत नव्या निवडणुका होतील. यापूर्वी पाकिस्तानच्या संसदेत पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्ताव फेटाळण्यात आला होता. दरम्यान, नॅशनल असेंब्लीमध्ये विरोधी पक्ष अजूनही उपस्थित असून त्यांनी स्वत: शाहबाज शरीफ ( Shahbaz Sharif ) यांची नवीन पंतप्रधान म्हणून निवड केली आहे.

रविवारी पाक पंतप्रधानांविरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर मतदान होणार होते, परंतु पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीचे उपसभापती कासिम खान सूरी यांनी परकीय षड्यंत्राचा आरोप करत अविश्वास प्रस्ताव फेटाळला आणि सभागृहात मतदान होऊ दिले नाही. उपसभापतींनी संसदेचे कामकाज 25 एप्रिलपर्यंत तहकूब केले आहे. याला राज्यघटनेचे उल्लंघन असल्याचे सांगत विरोधक याला कडाडून विरोध करत आहेत.