चित्रपटात काम देण्याचं आमिष दाखवून दिग्दर्शक पाच वर्षांपासून तरुणीवर करत होता लैंगिक अत्याचार

पुणे – पुण्यातून एक धक्कदायक बातमी समोर आली आहे. सिनेमात काम देण्याच्या बहाण्याने एका दिग्दर्शकाने तरुणीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. अमित प्रेमचंद सीटलानी या दिग्दर्शकाने २१ वर्षीय तरुणीवर सलग पाच वर्ष लैंगिक अत्याचार केल्याचा हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलीस स्थानकामध्ये आरोपीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,२१ वर्षीय पीडित तरुणी आणि आरोपी अमित प्रेमचंद सीटलानी यांची २०१८ च्या दरम्यान कामानिमित्त ओळख झाली. तुला फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम मिळून देतो. आपण एकत्रित काम करुयात,असे त्या तरुणीला आरोपीने सांगितले. त्यामुळे तिचा आरोपीवर विश्वास बसला. तेव्हापासून आजपर्यंत आरोपीने या तरुणीला विविध ठिकाणी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

अनेकदा विचारणा करून देखील काम दिले जात नसल्याने पुढे मग या दोघांमध्ये खटके उडाले. आरोपी अमित प्रेमचंद सीटलानीकडून फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित तरुणीने पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी तातडीने आरोपी अमित प्रेमचंद सीटलानी विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू असल्याची माहिती दिलीय. आरोपीने या तरुणीचे काही व्हिडीओ देखील बनवले असल्याचे सांगण्यात येत आहे.