अभिनंदन आत्या ! तुम्ही आमच्यासाठी प्रेरणादायी आहात – पार्थ पवार

नवी दिल्ली : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांची संसदेतील कामगिरी नेहमीच अव्वल असते. त्यामुळे त्या मागच्या सहा वर्ष संसदरत्न पुरस्कार पटकवत आहेत. यंदा देखील हा पुरस्कार सुप्रिया सुळे यांनाच मिळाला आहे. आता सुप्रिया सुळेंनी हा मानाचा पुरस्कार त्यांनी सगल ७ व्या वर्षी पटकवला आहे. चेन्नई येथील प्राईम पॉईंट फौंडेशन आणि ई- मॅगॅझिनतर्फे संसदेतील खासदारांच्या सर्वोत्तम कामगिरीसाठी हा पुरस्कार देण्यात येतो. गतवर्षी देखील याच संस्थेने त्यांना संसद महारत्न पुरस्कार देऊन गौरविले आहे.

खासदार सुप्रिया सुळे या संसदेत सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करत असून चालू यावर्षीही लोकसभेतही त्यांची कामगिरी सर्वोत्तम अशीच राहिली आहे. त्यांनी चालू लोकसभेच्या कामकाजात १ जून २०१९ ते ११ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत ९२ टक्के उपस्थिती लावत १६३ चर्चांमध्ये सहभाग घेतला. तब्बल ४०२ प्रश्न त्यांनी उपस्थित केले, इतकेच नाही, तर ८ खासगी विधेयकेही त्यांनी संसदेत सादर केली आहेत.

लोकसभेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खासदारांना या फौंडेशनतर्फे २०१० पासून संसदरत्न हा पुरस्कार देण्यात येतो. देशाचे माजी दिवंगत राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या संकल्पनेतून हा पुरस्कार सुरु करण्यात आला आहे, असे फौंडेशनचे के. श्रीनिवासन यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. गेल्या १२ वर्षांपासून संस्थेतर्फे हा पुरस्कार देण्यात येत असून आतापर्यंत ७५ खासदारांना तो देण्यात आला आहे. येत्या २६ मार्च रोजी दिल्लीमध्ये पुरस्कार वितरण कार्यक्रम पार पडणार आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

सुप्रिया सुळे यांना संसदरत्न पुरस्कार जाहीर झाल्यानंतर पार्थ पवार यांनी ट्विट करुन अभिनंदन केलं आहे. अभिनंदन आत्या, तुम्हाला पुन्हा एकदा संसद रत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. तुम्ही आमच्यासाठी प्रेरणादायी आहात,असं पार्थ पवार म्हणाले आहेत.