केंद्रीय तपास यंत्रणेच्या कामात लोकप्रतिनिधींनी बोलू नये; राऊतांवरील कारवाईनंतर सामंतांची प्रतिक्रिया

मुंबई : ईडीचे (ED) पथक रविवारी सकाळी शिवसेनेचे प्रवक्ते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत (Rajya Sabha MP Sanjay Raut) यांच्याकडे महाराष्ट्रात पोहोचले आहेत. पत्रा चाळ जमीन घोटाळ्याच्या संदर्भात ईडीचे अधिकारी संजय राऊत यांच्या घरी चौकशीसाठी पोहोचले आणि झडती घेतली. अधिवेशनाचे कारण सांगून त्यांनी चौकशीला हजर राहण्यास टाळाटाळ केली होती. त्यामुळेच आज ईडीचे पथक घरी दाखल झाल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

या चौकशीदरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांना संजय राऊत काही कागदपत्र समाधानकारक देवू न शकल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळेच त्यांच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार आहे. दरम्यान, या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकीय आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. याबाबत प्रतिक्रिया देताना आमदार उदय सामंत (uday samant) म्हणाले, शिवसनेकडून ही कारवाई सुडबुद्दीने करण्यात येत असल्याची टीका करण्यात आली आहे. हे त्यांच व्यक्तिक मत असू शकते. परंतु केंद्राची किंवा राज्याची एखादी तपास यंत्रणा कारवाई करत असेल त्यावर लोकप्रतिनिधी म्हणून बोलणं उचित नाही.

संबंधित यंत्रणा चौकशी करतात त्यातून योग्य काय आणि अयोग्य काय हे ठरत असतं. त्यामुळे त्यावर जास्त बोलणं योग्य नाही . आम्हीसुद्धा बाळासाहेबांचाच विचार घेऊन राजकारण, समाजकारण करतो. त्यामुळे कितीही ईडी कारवाई झाली तरी शिवसेना सोडणार नाही, बाळासाहेबांचा लढाऊपणा सोडणार नाही. असं म्हणाऱ्या संजय राऊतांनाच याचा अर्थ माहिती असेल , असेही सामंत म्हणाले.