मोदींच्या गॅरेंटीवर जनतेचा अढळ विश्वास, चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा

Chandrashekhar Bawankule On Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वावर जनतेच्या अढळ विश्वासासह स्त्रीशक्ती, युवाशक्ती, शेतकरी आणि गरीब कुटुंबे या चार अमृतस्तंभाचा होणारा शाश्वत विकास हाच भारताचा कणा असेल, असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. ५१ टक्के मते आपल्याला मिळविण्यासाठी सतत जागे राहा, असे आवाहन त्यांनी सुपर वॉरियर्ससह पदाधिकाऱ्यांना केले.

मंगळवारी मुंबईतील तीन लोकसभा मतदारसंघातील प्रत्येकी तीन याप्रमाणे नऊ विधानसभा क्षेत्रातील बूथ प्रमुख म्हणजे, सुपर वॉरियर्ससोबत त्यांनी संवाद साधला. त्यांच्या या प्रवासात भाजपा मुंबई अध्यक्ष आ. आशिष शेलार, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील यांच्यासह संबंधित मतदारसंघातील पदाधिकारी सोबत होते. भाजपाच्या सुपर वॉरियर्संना मार्गदर्शन करीत श्री बावनकुळे म्हणाले की, आत्मनिर्भर व जगातला सर्वोत्तम भारत निर्माण करण्याचा संकल्प भाजपाच्या नेतृत्वाने केला आहे. मागील साडेनऊ वर्षांत देशासाठी अनेक निर्णय घेतले त्यावर जनतेने अलीकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिक्कामोर्तब केले. महिला सक्षमीकरणाच्या योजना, गरीब जनतेसाठी अन्न सुरक्षा योजना शिवाय समाजातील सर्वच घटकांसाठी मोदी सरकारने अनेक योजना राबविल्या, निर्णय घेतले व त्यातून जनतेला आत्मविश्वास मिळवून दिला. त्याचाच चांगला परिणाम अलीकडे तिन्ही राज्यात भाजपाचा विजय होण्यात झाला; तसाच महाराष्ट्रातही महायुतीचा विजय होणार आहे. महाराष्ट्रात महायुतीचे ४५ प्लस खासदार, २२५ प्लस आमदार निवडून येतील, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. देशात ३५० प्लस एनडीएचे खासदार निवडून येतील, असा विश्वास श्री बावनकुळे यांनी व्यक्त केला.

• भारत जगातला सर्वोत्तम देश
कॉंग्रेसने मागील ६५ वर्षे अनाचार, दुराचार, भ्रष्टाचार आणि गरीब कल्याणाचे काम केले नाही. सुवर्णकाळातील भारत निर्माण करण्याची क्षमता मोदींमध्येच आहे, हे प्रत्येक मतदाराला माहिती आहे. देशातील महिला मतदार मोदींच्या मागे उभे आहेत. देशाची युवाशक्ती भारताला जागतिक मान्यता व जगातला सर्वोत्तम देश होताना पाहत असून त्यांचा पंतप्रधान मोदींवर पूर्ण विश्वास आहे, असेही प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले.

• दिवसभर मॅरेथॉन बैठका
प्रदेशाध्यक्ष श्री बावनकुळे यांनी सकाळी ११ वा. दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील चेंबूर, अनुशक्ती नगर व धारवी या विधानसभा क्षेत्रातील सुपर वॉरियर्स व प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला व मार्गदर्शन केले. त्यानंतर दुपारी दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील शिवडी, वरळी, व भायखळा या तीन विधानसभा आणि सायंकाळी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील अंधेरी पूर्व, अंधेरी पश्चिम व जोगेश्वरी या तीन विधानसभा क्षेत्रातील सुपर वॉरिर्यस व प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.

• विजयाचे शिल्पकार व्हा
लोकसभेपाठोपाठ येणाऱ्या विधानसभा निवडणुका शिंदे-फडणवीस व अजितदादांच्या नेतृत्त्वात लढविणार आहोत. भाजपासह राज्यातील महायुतीला केवळ विजय नव्हे तर महाविजय साकारायचा आहे,हा निर्धार करूनच मी राज्यभरात प्रवास करीत आहे. भाजपाचे सुपर वॉरियर्स या विजयाचे शिल्पकार ठरणार आहेत. मोदी सरकार व राज्यातील महायुती सरकारच्या योजना अंतिम व्यक्तीपर्यंत पोहचविण्यासाठी दररोज तीन तास संपर्क करावा असे आवाहन बावनकुळे यांनी केले.

महत्वाच्या बातम्या-

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या हद्दीतील अनधिकृत अतिक्रमणे हटवली जाणार; सात दिवसांचा अल्टीमेट्म

राज्यात 45 च्या वर खासदार तुम्हाला महायुतीचे दिसतील; महायुतीच्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास

अमरावती लोकसभेची जागा आम्हालाच पाहिजे,नवनीत राणा यांनी…; बच्चू कडू यांचं मोठं विधान