कात्रज कोंढवा रस्त्यावर स्मशानभूमी चौकात कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात; खासदार सुळे यांची मागणी

पुणे : कात्रज-कोंढवा रस्त्यावर खडीमिशन पोलीस चौकीपासून जवळच झालेल्या अपघातानंतर खासदार सुप्रिया सुळे ( MP Supriya Sule ) यांनी चिंता व्यक्त केली आहे. सातत्याने या ठिकाणी अपघात आणि वाहतूक कोंडी होती असल्याने येथे कायमसावरूपी उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी ट्विटद्वारे केली आहे.

जिल्ह्याचे पालकमंत्री आणि प्रशासनाने याबाबत गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचे सुळे यांनी म्हटले आहे. आज झालेल्या अपघातात कंटेनरचे ब्रेक फेल झाल्यामुळे त्याचा धक्का बसून आठ वाहनांचे नुकसान झाले. यामध्ये स्कुल बसचाही समावेश आहे. शिवाय एका व्यक्तीला प्राण गमावावे लागले. या अपघातामुळे जवळपास दोन तीन तास वाहतूक ठप्प झाली होती, असे त्यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे.

अपघात जेथे झाला ती जागा उताराची अरुंद असून अपघातप्रवण आहे. येथे सातत्याने दुर्दैवी घटना घडतात. यापूर्वीही अनेक नागरीकांना याठिकाणी झालेल्या छोट्या मोठ्या अपघातांत गंभीर स्वरुपाच्या दुखापतींना सामोरे देखील जावे लागले आहे. हे रोखण्यासाठी येथे कायमस्वरुपी उपाययोजना करणे गरजेचे आहे. याबाबत पालकमंत्री पुणे आणि शासनाने सकारात्मक विचार करावा, असे खासदार सुळे यांनी पुढे नमूद केले आहे.