मुंबई इंडियन्स फायनलला येऊ नये, त्यांची भीती वाटते; सीएसकेचा गोलंदाजी प्रशिक्षक घाबरला!

IPL 2023 Final:  लखनऊ सुपरजायंट्स विरुद्धचा आयपीएल २०२३ मधील एलिमिनेटर सामना ८१ धावांनी जिंकत मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात प्रवेश आहे. २६ मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्सविरुद्ध मुंबई दोन हात करेल. हा सामना जिंकणारा संघ २८ मेला अहमदाबाद येथेच चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध (Chennai Super Kings) अंतिम सामन्यात भिडेल. दरम्यान, त्याआधी चेन्नई सुपर किंग्जचा गोलंदाजी प्रशिक्षक ड्वेन ब्राव्होने (Dwyane Bravo) म्हटलं की, “फायनलमध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळायचं नाही.”

गुजरात टायटन्सविरुद्ध क्वालिफायर एकमध्ये १५ धावांनी विजय मिळवल्यानतंर एका मुलाखतीत ब्राव्होने म्हटलं की, “मला मुंबई इंडियन्सची भीती वाटते आणि मला व्यक्तिगत वाटतं की आमची फायनलमध्ये मुंबईशी गाठ पडू नये.”

ड्वेन ब्राव्हो म्हणाला की, “खरं सांगू तर मला मनापासून नाही वाटत की मुंबई इंडियन्स फायनलमध्ये पोहोचावी. माझा मित्र पोलार्डला याबद्दल माहिती आहे. गंमतीची गोष्ट बाजूला ठेवली तर मी सर्व संघांना बेस्ट ऑफ लक देतो. आमची नजर यावरच असेल की कोण फायनलमध्ये पोहोचणार?”