नारदाच्या गादीचा अपमान करणाऱ्या पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांनी अखेर मागितली माफी

चाळीसगाव – २७ एप्रिल रोजी रात्री चाळीसगाव ( Chalisgaon ) शहरातील संतोषी माता मंदिराजवळ कीर्तन कार्यक्रम १० वाजेनंतर सुरु असल्याचे लक्षात येताच शहर पोलीस निरीक्षक के.के.पाटील ( Police Inspector K.K. Patil ) यांनी त्याठिकाणी जाऊन सदर माईक बंद केला तसेच संप्रदायात पवित्र अश्या नारदाच्या गादीवर बुटासहित पाय ठेवले गेल्याची घटना घडली होती. सदर फोटो व व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाले असता राज्यभरातील वारकारी संप्रदाय ( Warakari  sampraday) व हिंदू जनमानसात तीव्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या होत्या. या वादावर अखेर भाजप आमदार मंगेश चव्हाण ( BJP MLA Mangesh Chavan ) यांनी मध्यस्थी केल्याने पडदा पडला आहे.

चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार,  काल मध्यरात्री याबाबत बातमी कळली तसेच चाळीसगाव तालुक्यातील वारकरी संप्रदायातील मान्यवर व हिंदुत्ववादी संघटनांचे याबाबत फोन आले असता मी तत्काळ पोलीस निरीक्षक के के पाटील यांना सदर विषयाचे गांभीर्य लक्षात आणून दिले व याचे उद्या राज्यभरात पडसाद उमटून कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होईल याची कल्पना दिली. त्यावेळी पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांनी देखील सदर घटना अनवधानाने झाली असून मला नारदाच्या गादीचे महत्व माहिती नव्हते असे सांगितले, कर्तव्य बजावत असताना हि चूक झाली असल्याने मी सर्व वारकरी संप्रदायाची जाहीर माफी मागण्यास तयार असल्याचे सांगितले. याबाबत मी वारकरी संप्रदायातील कीर्तनकार, मान्यवर व पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांची बैठक आपल्या अंत्योदय जनसेवा कार्यालयात ( Antyodaya Janseva Office ) घडवून आणली. त्यावेळी पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांनी विठ्ठलाच्या प्रतिमेला साक्षी ठेवून अनवधानाने घडलेल्या या चुकीबद्दल जाहीर माफी मागत असल्याचे सांगितले.

चव्हाण म्हणाले, मी स्वतः वारकरी पुत्र असल्याने माझ्याही भावना दुखावणे साहजिकच होते मात्र तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांचे काम, त्यांनी शहरातील अवैध धंधे, मुलींची छेड गाडणारे गावगुंड यांचा केलेला बंदोबस्त व आजवरची त्यांची कामगिरी माझ्यासह चाळीसगाव शहराने अनुभवली असल्याने या सर्व विषयावर पडदा पडावा, तसेच सर्व समाजाला सदर घटनेतील पोलीस प्रशासनाची बाजू कळावी या उद्देशानेचाळीसगाव शहरातील वारकरी संप्रदायातील कीर्तनकार व मान्यवर मंडळी सोबत त्यांची बैठक आज चाळीसगाव येथील कार्यालयात घडवून आणली असल्याचे सांगितले पुन्हा अश्या घटना घडणार नाहीत याची काळजी घेण्याच्या सूचना देखील पोलीस प्रशासनाला केल्या.

गेली दोन वर्ष कोविड मुळे कीर्तन बंद होते, चाळीसगाव तालुक्यात आता कुठे काही प्रमाणात कीर्तन सप्ताह सुरु झाले असून त्यासाठी पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांची वेळोवेळी मदत झाली असल्याचे उपस्थित कीर्तनकार व मान्यवर यांनीदेखील मान्य केले. व के.के.पाटील यांच्याकडून ही चूक अनवधानाने झालेली असल्याचे त्यांनी मान्य केल्याने व वारकरी संप्रदायाची जाहीर माफी मागितली आहे. वारकरी संप्रदाय हा सहनशील असून आपण आजवर अनेकांच्या चुका पोटात घेतल्या आहेत. एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याकडून ही चूक झाल्याने तसेच चाळीसगाव शहरातील त्यांचे आजवरचे चांगले काम पाहता हा विषय आम्ही इथेच थांबवीत असल्याचे जाहीर केले तसेच आता यापुढे सोशल मिडीयावर कुठल्याही प्रकारच्या प्रतिक्रिया देऊ नये असे देखील चव्हाण यांनी आवाहन केले.