पोलिसांनी अमरावतीमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला, नवनीत राणांच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त

अमरावती – अमरावतीच्या राजापेठ चौकातील उड्डाणपुलावर चार दिवसांपूर्वी मध्यरात्री आमदार रवी राणा व त्यांच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवला होता. या पुतळ्यासाठी लागणाऱ्या आवश्यक परवानग्या आमदार रवी राणा यांनी घेतल्या नव्हत्या. त्यामुळे हा पुतळा वादाच्या  भोवऱ्यात अडकला होता. दरम्यान  मध्यरात्री पोलीस बंदोबस्तात प्रशासनाने हा पुतळा काढला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवू नये अशी मागणी युवा स्वाभिमान पक्ष,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली होती. दरम्यान, या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता  खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या घरासमोर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.   आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्या घरासमोर पोलीस व एसआरपीएफचा मोठा बंदोबस्त लावून त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे अशी माहिती देखील समोर येत आहे.

या संदर्भात आमदार रवी राणा यांनी महानगरपालिकेत बैठक घेऊन या पुतळ्याला सर्व परवानग्या तात्काळ देण्यात यावे अशी मागणी केली होती. तसेच  इथून पुतळा हलविल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील असा इशारा सुद्धा आमदार रवी राणा यांनी दिला होता.