निलेश लंकेंनी रस्त्याच्या आंदोलनाचे हत्यार उपसल्या नंतर; सुजय विखेंची झाली  कोंडी

लंके यांच्या रस्त्याच्या आंदोलनाला समाज माध्यमांमधून पाठिंबा

गणेश जगदाळे/अहमदनगर – पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी नुकतीच जिल्हाधिकारी यांची भेट घेत कल्याण-निर्मल या राष्ट्रीय महामार्गाचे रखडलेले काम पुन्हा सुरू करावे, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करू, असा इशारा दिला. समाज माध्यमांमधून या विषयाला महत्त्व आले आहे व लंके यांच्या आंदोलनाला अनेकांनी पाठिंबा दर्शवला आहे. महत्त्वपूर्ण असलेल्या कल्याण-निर्मल या राष्ट्रीय महामार्गाच्या प्रश्ना संदर्भात आमदार निलेश लंके यांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे या आंदोलनाच्या माध्यमातून खासदार डॉ. सुजय विखे यांची कोंडी करण्याचा प्रयत्नही लंके हे करत असल्याचीसुद्धा चर्चा नगर दक्षिण लोकसभा मतदार संघात सुरू झाली आहे.

कल्याण-निर्मल या राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या सात वर्षांपासून सुरू आहे, मात्र जागोजागी पडलेले खड्डे, उखडलेल्या साइडपट्ट्यांमुळे आतापर्यंत अनेक अपघात होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. काहींना कायमचे अपंगत्व आले आहे. या मार्गाचे काम व्हावे म्हणून विविध प्रकारचे आंदोलने झाली, मात्र तरीही या मार्गाचे काम अद्यापही पूर्ण न झाल्याने मोठी अस्वस्थता सध्या प्रवाशांमध्ये आहे. अनेक आंदोलने झाली असली, तरीही जिल्ह्यातील कार्यरत असलेल्या एकाही मोठ्या नेत्याने या विषयावर आंदोलन न केल्याने प्रवाशांच्या अस्वस्थतेमध्ये आणखी वाढ झाली आहे.

या पार्श्वभूमीवर या पाथर्डी, शेवगाव व नगर तालुक्यातूनही निलेश लंके यांच्या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. मतदारसंघाशी कोणतेही नाते नसलेल्या लंके यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतल्याने हा प्रश्न कदाचित मार्गी लागू शकतो अशी आशा आता काहींना वाटू लागली आहे. पाथर्डी भागात काहींनी तर लंके यांच्या आंदोलनात सहभागी होण्याचाही निर्णय घेतला आहे. या विषयावर पुढाकार घेऊन ठोस निर्णय होईल. अशी अनेकांना अपेक्षा वाटत आहे.

रस्त्याचा प्रश्न हातात घेतल्याने लंके ठरलेत हीरो

पाथर्डी, शेवगाव व नगर भागामध्ये काहींनी या मार्गाचे काम पूर्णच होणार नाही, असा समज करून घेतला होता. परंतु आमदार लंके यांनी रस्त्याच्या प्रश्नासंदर्भात जिल्हाधिकारी यांची भेट घेत पाठपुरावा सुरू केला आहे व आंदोलनाचे हत्यार उपसले असल्यामुळे मात्र, सध्या तरी या विषयापुरते आमदार लंके हीरो ठरले आहे.

खासदार सुजय विखे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न

नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादीकडून लोकसभेसाठी चर्चेत असलेले नाव म्हणजे निलेश लंके त्यामुळे आता लंके यांनी कल्याण-निर्मल रखडलेल्या रस्त्याचा प्रश्न हातात घेतल्यामुळे नगर दक्षिणचे खासदार सुजय विखे यांची चांगलीच कोंडी झाल्याची चर्चा आहे. लंके यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर खासदार सुजय विखे यांनी व्हिडिओ शेअर करत रस्त्याच्या वास्तुस्थिती संदर्भात माहिती दिली आहे.