मी तर तुझाच मावळा; शहराध्यक्ष पदावरून काढल्यानंतर वसंत मोरेंची  पोस्ट…

पुणे – मशिदींवरील भोंगे काढून न टाकल्यास त्यासमोर स्पीकरवर हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) लावण्याची भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढी पाडव्याच्या दिवशी झालेल्या मेळाव्यामध्ये घेतली होती. त्यानुसार काही भागात मनसे कार्यकर्त्यांनी हनुमान चालिसेचा जाप देखील सुरू केला.

दरम्यान, मनसेचे पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे(Vasant More) यांनी मात्र या भूमिकेच्या विरोधात भूमिका घेत शहरात भोंगे लावणार नसल्याचं जाहीर केलं. त्यामुळे मनसेमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याचं चित्र निर्माण झालं होतं. त्याचाच परिणाम म्हणून आज राज ठाकरेंनी पुण्यातील पदाधिकाऱ्यांना भेटीसाठी पाचारण केलं असताना वसंत मोरेंना त्यातून वगळण्यात आलं होतं. अखेर त्यांची पुणे शहर अध्यक्षपदावरून उचलबांगडी करण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे.

राज ठाकरेंनी पत्र काढत साईनाथ बाबर (Sainath Babar) यांची पुणे शहरअध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली असल्याचं म्हटलं आहे. ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने आज नगरसेवक साईनाथ संभाजी बाबर यांची पुणे शहरअध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. नव्या जबाबदारीसाठी साईनाथ बाबर यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि भावी राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा’, असं या नियुक्तीपत्रात म्हटलं आहे.

दरम्यान, या घडामोडींवर मोरे हे नेमकी काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले असताना आता त्यांनी केलेली फेसबुक पोस्ट सध्या चांगलाच चर्चेचा विषय बनली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी बाबर यांचे अभिनंदन केले आहे. सोबत  आरे मी तर कधी पासूनच तुझा मावळा आहे  कार्यक्षम नगरसेवक मनसेचे गटनेते साईनाथ बाबर यांची पुणे शहर अध्यक्ष पदी निवड खुप खुप अभिनंदन साई असा मजकूर लिहिला आहे.